मनपाला विकास निधी प्राप्त
अकाेला : सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेअंतर्गत शासनाकडून महापालिकेला साडेचार काेटींचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये मनपाला ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा करावा लागणार असून, एकूण ५ काेटी ८५ लाख रुपयांतून प्रस्तावित विकासकामे निकाली काढले जाणार आहेत. तसे प्रस्ताव नगरसेवकांकडून मागितले आहेत.
दलितवस्ती याेजना; निधी मंजूर
अकाेला : महापालिका प्रशासनाला दलितवस्ती सुधार याेजनेअंतर्गत साडेचार काेटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्राप्त निधीतून नाली, रस्ते,पथदिवे आदी विकासकामे केली जातील. या निधीतून प्रभागातील विकासकामे निकाली काढण्यासाठी नगरसेवकांची धांदल सुरू झाली आहे.
रस्त्यांवर माती; वाहनधारक त्रस्त
अकाेला : शहरातील प्रमुख रस्त्यांची मनपातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर साफसफाई केली जात आहे. रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर जमा झालेली माती ट्रॅक्टरमध्ये जमा न करता दुभाजकालगत ढीग लावला जात असून, उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
माेहम्मद अली चाैकात स्वच्छता
अकाेला : माेहम्मद अली चाैक परिसरात अत्यंत दाटीवाटीने व्यावसायिकांची दुकाने आहेत. याठिकाणी मनपाने नियमित साफसफाइ करणे अपेक्षित असताना तसे हाेत नसल्याचा आराेप व्यावसायिकांमधून केला जात आहे. मच्छी मार्केटमध्ये मांसाचे तुकडे उघड्यावर फेकल्या जातात.यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
पडीक प्रभाग वाऱ्यावर; ‘एसआय’ झाेपेत
अकाेला : मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रभागातील तसेच खासगी सफाई कर्मचाऱ्यांना पडीक प्रभागातील नाले, सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे; परंतु सफाई कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी साफसफाईकडे पाठ फिरवल्याने नाले, गटारे तुंबल्याचे दिसून येत आहे.
निमवाडी मार्ग अंधारात
अकोला : मुख्य मार्गावरील पथदिवे सुरू राहत असल्याचा दावा मनपाकडून केला जातो. मात्र खदान पोलीस ठाणे ते निमवाडी लक्झरी बस स्टॅन्ड मार्गावरील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. या मार्गावरील जड वाहतूक लक्षात घेता अकाेलेकरांच्या जिवाला धाेका निर्माण झाला आहे.
जठारपेठ चौकात वाहतुकीची कोंडी
अकोला : शहराच्या पूर्व झाेनमधील जठारपेठ चाैकात शनिवारी वाहतुकीची कोंडी झाली हाेती. मुख्य रस्त्यालगत भाजीपाला विक्रेता, फळ विक्रेत्यांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. भाजी व्यावसायिकांना मनपा शाळा क्रमांक ५ मध्ये पर्यायी जागा दिल्यानंतरही त्यांनी रस्त्यालगत दुकाने थाटली आहेत.
शहरात धुरळणी, फवारणी नाहीच!
अकोला : शहरात नाले-गटारांची नियमित साफसफाई होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी मनपाच्या हिवताप विभागाकडून धुरळणी व फवारणी केली जात नसल्याचे समाेर आले आहे. याकडे नगरसेवकांचेही दुर्लक्ष हाेत आहे.