अकोला: बाजार ‘अनलाॅक’ होताच जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन आणि समाजकल्याण विभागाच्या योजनेंतर्गत कोरोनाकाळात रेंगाळलेली दुधाळ जनावरांची खरेदी अखेर ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा वार्षिक उपयोजना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थींसाठी ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांची वाटप योजना राबविण्यात येत आहे. दहा कोटी रुपयांच्या योजनेत पाच कोटी रुपयांच्या निधीतून म्हैस वाटप आणि पाच कोटी रुपयांच्या निधीतून शेळी गटांच्या वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लाभार्थींसाठी शंभर टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. १ कोटी २० लाख रुपयांच्या या योजनेत निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना दोन म्हशींचे वाटप करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन आणि समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांच्या वाटप योजनेंतर्गत लाभार्थींची निवड करण्यात आली होती; मात्र कोरोनाकाळात गुरांचे बाजार बंद होते. त्यामुळे लाभार्थींना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यासाठी जनावरांची खरेदी करण्याची प्रक्रिया रेंगाळली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरांचे बाजार सुरू झाल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन आणि समाजकल्याण विभागामार्फत ३ सप्टेंबरपासून दुधाळ जनावरांची खरेदी सुरू करण्यात आली. त्यामुळे दोन्ही विभागांच्या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लाभार्थींना दुधाळ जनावरांचे वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला.
बडनेरा येथील बाजारातून
दुधाळ जनावरांची खरेदी !
जिल्हा परिषद पशुसंवर्धन आणि समाजकल्याण विभागाच्या दुधाळ जनावरे वाटपाच्या योजनेंतर्गत जिल्ह्याबाहेरील गुरांच्या बाजारातून दुधाळ जनावरांची खरेदी करण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील गुरांच्या बाजारातून बाजाराच्या दिवशी (शुक्रवारी) दुधाळ जनावरांची खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी बडनेरा येथील गुरांच्या बाजारातून म्हशींची खरेदी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन आणि समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांच्या वाटप योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यासाठी बडनेरा येथील गुरांच्या बाजारातून दुधाळ जनावरांची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर सुलताने
गटनेता, सत्तापक्ष, जिल्हा परिषद.