संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : टोकन देण्यात आलेल्या शेतकर्यांची हमी दराने तूर खरेदी गत ३१ ऑगस्टपासून बंद करण्यात आली आहे; मात्र गत महिनाभराच्या कालावधीत ३१ ऑगस्टपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अडकले आहेत. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ात तूर खरेदीचे १६४ कोटी १६ लाख ७४ हजार रुपयांचे चुकारे अद्याप बाकी आहेत. शासनाच्या अधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’द्वारे हमीदराने तूर खरेदी गत १0 जूनपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर खरेदी केंद्रांवर गत ३१ मेपर्यंत टोकन देण्यात आलेल्या शेतकर्यांची तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय गत २१ जुलै रोजी शासनामार्फत घेण्यात आला. शासन निर्णयानुसार, ३१ ऑगस्टपर्यंत तूर खरेदीची मुदत होती. त्यानुसार टोकन देण्यात आलेल्या शेतकर्यांची तूर ३१ ऑगस्टपर्यंत खरेदी करण्यात आली. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला आणि वाशिम या दोन जिल्हय़ात २६ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत ३ लाख २५ हजार ९२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. गत महिनाभराच्या कालावधीत अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे १६४ कोटी १६ लाख ७४ हजार रुपयांचे चुकारे मात्र अद्यापही तूर विकलेल्या शेतकर्यांना मिळाले नाही. त्यामुळे विकलेल्या तुरीचे चुकारे केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्यांकडून केली जात आहे.
शासनाकडून निधीची प्रतीक्षा!खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे शेतकर्यांना वितरित करण्यासाठी शासनाकडून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला निधी उपलब्ध झाला नसल्याने, तूर खरेदीचे चुकारे रखडले आहेत. त्यानुषंगाने रखडलेले तुरीचे चुकारे शेतकर्यांना देण्यासाठी शासनामार्फत तुरीच्या चुकार्यापोटी निधी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनला केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.