अकोला: गेल्या २२ एप्रिलपासून बंद केलेली तूर खरेदी पंचनाम्यानंतर सुरू करण्यात आली. गेल्या तीन दिवसात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रात पडून असलेल्या ३७३ पैकी ११३ शेतकऱ्यांची १,९७९ क्विंटल खरेदी झाली आहे. दोनशे शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. दरम्यान, ढगाळ वातावरण आणि चोरीपासून तुरीचे संरक्षण करण्यासाठी तालुका उपनिबंधकांनी बाजार समितीला पत्र देत खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत होती. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर तसेच अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी नाफेडद्वारे तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. तुरीची आवक मोठ्या प्रमाणात असताना, खरेदी संथगतीने करण्यात आली. त्यामुळे गेल्या २६ फेबु्रवारी रोजी खरेदी केंद्रांवर आलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमापच होऊ शकले नाही. दीड महिना उलटूनही तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. त्यातच २२ एप्रिल रोजी नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली. तूर खरेदी बंद झाली त्या दिवशी जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर १ हजार ९६३ तुरीचे ट्रॅक्टर उभे होते. त्यामुळे अकोला जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात हीच स्थिती असल्याने शेतकऱ्यांसह विविध पक्ष संघटनांनी गदारोळ केला. त्यामुळे केंद्रावर उभ्या असलेल्या वाहनांचे पंचनामे करून ती खरेदी करणे शासनाला भाग पडले. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत ३७३ वाहने उभी आहेत.त्यातील वाहने आणि ठिय्या केलेल्या तुरीचे मोजमाप २८ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. गेल्या तीन दिवसात १,९७९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. सहकार विभागाच्या तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्यासह बाजार समिती कर्मचाऱ्यांनी त्यासाठी शेतकऱ्यांना टोकन वाटप करणे, मोजमाप प्रक्रिया सुरू केली. ठिय्यांची मंगळवारी प्राधान्याने मोजणीबाजार समितीमध्ये काही शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. त्यांच्याकडे ट्रॉलीची व्यवस्था नसल्याने त्यांना टोकन देण्यात आले. तसेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे मोजमाप सुरू करण्यात आले. ठिय्या दिलेल्या शेतकऱ्यांना टोकन देऊन मंगळवारी त्यांचे मोजमाप प्राधान्याने केले जाणार आहे, असे तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी सांगितले. रविवारी नाफेडतर्फे तूर खरेदी!४जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवरील तुरीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही तूर खरेदी सुरू होती.जवळपास ९०२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.रविवारी खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात आले. पाच काट्यावर ९०२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. -मनोज वाजपेयी, जिल्हा विपणन अघिकारी, नाफ ेड ,अकोला.
तीन दिवसात दोन हजार क्विंटल तुरीची झाली खरेदी!
By admin | Published: May 01, 2017 3:14 AM