- अतुल जयस्वाल
अकोला : दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येत्या सोमवारपासून तीन नवीन डेमू गाड्या सुरु होणार असून, यामध्ये पूर्णा ते अकोट अशी गाडी प्रस्तावित असतानाही ती केवळ आता अकोल्यापर्यंतच धावणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. सोमवार, १९ जुलैपासून पूर्णा ते अकोला अशी डेमू गाडी धावणार असून, अकोटकरांच्या नशिबी पुन्हा एकदा प्रतीक्षाच आली आहे.अकोला ते अकोट दरम्यानच्या मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला असला तरी अजूनही या मार्गावर एकही प्रवासी गाडी सुरु करण्यात आली नाही. पूर्णा ते खंडवा हा लोहमार्ग अकोटपर्यंत ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित झाला असून, मेळघाटातील व्याघ्रप्रकल्पामुळे अकोट ते अमलाखुर्द दरम्यानचे काम थंडबस्त्यात पडले आहे. खंडवापर्यंत रेल्वे जाणार नसेल, तर किमान अकोटपर्यंत तयार असलेल्या मार्गावर प्रवासी रेल्वेगाडी सुरु करावी, अशी मागणी अकोटकरांनी लावून धरली होती. कोरोना काळात गतवर्षी रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद होती. आता हळूहळू प्रवासी वाहतूक पूर्ववत होत असल्याच्या पृष्ठभूमीवर नांदेड ते अकोट अशी डेमू गाडी सुरु होणार असल्याची चर्चा मध्यंतरी होती. अकोटच्या रेल्वे कार्यकर्त्यांसह जनसामान्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पूर्णा ते अकोट अशी डेमू गाडी सुरु करण्याचा प्रस्तावही दक्षिण-मध्य रेल्वेने तयार केला होता. प्रत्यक्षात मात्र पूर्णा ते अकोला व अकोला ते पूर्णा अशी डेमू गाडी १९ जुलैपासून धावणार असल्याचे दक्षिण-मध्य रेल्वेने शनिवारी जाहीर केले. त्यामुळे अकोट तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना आहे.
अशी धावणार डेमू
०७७७४ अकोला ते पूर्णा ही विशेष डेमू गाडी १९ जुलैपासून अकोला येथून दुपारी चार वाजता निघून पूर्णा येथे रात्री ९:१० वाजता पोहोचेल.
०७७७३ पूर्णा ते अकोला ही विशेष डेमू गाडी १९ जुलैपासून पूर्णा रेलवे स्थानकावरुन सकाळी सात वाजता निघून अकोला येथे दुपारी १२:१० पोहोचेल.
आरक्षणाची गरज नाही
या गाड्या अनारक्षित प्रवासाकरिता खुल्या असतील. प्रवास करताना राज्य आणि केंद्र सरकारच्या कोविड-१९ नियमाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या गाड्यांना जिल्ह्यात लोहगड, बार्शीटाकळी, शिवणी शिवापूर या स्थानकांवर थांबा असणार आहे.
वर्षभरापूर्वी झाले होते परीक्षण
ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित झालेल्या अकोला ते अकोट लोहमार्गावर गतवर्षी २४ जुलै रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी दोन दिवसीय पाहणी करून या मार्गावर ताशी ११० किमी वेगाने परीक्षण रेल्वे चालविण्यात आली होती. चाचणी यशस्वी झाल्यानंतर अकोटपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल होण्याची शक्यता बळावली होती.
अकोट स्टेशनची इमारत सज्ज
अकोट येथे रेल्वे स्टेशनची इमारत नव्याने बांधण्यात आली असून, सर्व यंत्रणा सज्ज आहे. रेल्वेगाड्याच सुरु नसल्यामुळे या ठिकाणी अद्याप कर्मचारी वृंद नाही. रेल्वे व कर्मचाऱ्यांअभावी नवनिर्मित इमारतीला भकास स्वरुप प्राप्त झाले आहे.
आश्वासन पाळले नाही
ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यावर नांदेड ते अकोट अशी गाडी सुरु करण्यासाठी अकोट शहर व तालुक्यातील रेल्वे कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी जोरदार मागणी रेटून धरली होती. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. जनरेट्यापुढे झुकत दक्षिण- मध्य रेल्वेने ७ जुलै रोजी आश्वासन देऊन आंदोलन थंड करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात मात्र आश्वासन पाळलेच नाही.
अकोटला पुन्हा एकदा रेल्वे कनेक्टिव्हिटी प्राप्त व्हावी यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला अकोटपर्यंत डेमू गाडी सुरु करण्याचे आश्वासनही दिले. प्रत्यक्षात मात्र आमच्या पदरी निराशाच पडली आहे. आता आम्ही पुन्हा जोमाने तयारीला लागून तीव्र आंदोलन छेडणार आहोत.
विजय जितकर, रेल्वे ॲक्टिव्हिस्ट, तथा
सामाजिक कार्यकर्ता, अकोट
.