अकोला : शापित खारपाणपट्ट्यातील पूर्णा (नेर-धामणा) बॅरेजच्या कामात सारखे अडथळे येत असून, डिझाइन बदलल्याने आता नव्याने सुधारित प्रशासकीय (सुप्रमा) मान्यतेची गरज निर्माण झाली आहे. यानुषंगाने पाटबंधारे मंडळाने प्रस्ताव तयार करू न शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाची फाइल जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या टेबलवर पोहोचली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पाटबंधारे मंडळाने २०२० मध्ये बहुप्रतीक्षित या बॅरेजमध्ये जलसाठ्याचे नियोजन केले आहे.खारपाणपट्ट्यातील भूस्तर चोपण मातीचा असून, या भागात खडक नसल्याने आधुनिक तंत्रज्ञान वापरू न बॅरेजचे काम करावे लागत आहे. २००९ मध्ये बॅरेजचे काम सुरू करण्यात आले. आतापर्यंत दोन ते तीन वेळा काम बंद पडले होते; पण या दोन वर्षांत काम वेगात होत असून, ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ६३८ कोटी रुपयांपर्यंत बॅरेजची किंमत पोहोचली; पण पुन्हा डिझाइन बदलल्याने धरणाची किंमत ८८८.८१ कोटींपर्यंत पोहोचली आहे. याकरिता नव्याने सुप्रमाची गरज असल्याने पाटबंधारे मंडळाने प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच या प्रस्तावाला अर्थात सुप्रमा मिळून बॅरेजचे राहिलेले काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन पाटबंधारे मंडळाने के ले आहे.
पूर्णा बॅरेजचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या २०२० पर्यंत धरणात पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठीचा सुप्रमा लवकरच मिळणार आहे. प्रधान सचिवांकडे सुप्रमासाठीचा प्रस्ताव पोहोचला आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.