- अतुल जयस्वाल
अकोला : कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता समुह संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी केल्यावर त्यांना उपचारार्थ दाखल करणे अर्थात 'टेस्टिंग', 'ट्रेसिंग' व 'ट्रिटमेंट' ही त्रिसुत्री निश्चित करण्यात आली आहे. अकोल्यात मात्र संदिग्ध कोरोना रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर पुढील चार ते पाच दिवस त्यांचा अहवालच प्राप्त होत नसल्याने दरम्यानच्या काळात या संभाव्य रुग्णांकडून अनेकांना संसर्गाचा 'प्रसाद' वाटल्या जात असल्याचे वास्तव आहे. यामुळे रुग्णांचा शोध घेऊनही केवळ अहवाल वेळेवर मिळत नसल्याने टेस्टिंग व ट्रेसिंगच्या मुळ उद्देशालाच हरताळ फसल्या जात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात गत वर्षी डिसेंबरपासून उतरणीला लागलेला कोरोनाचा आलेख फब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतर पुन्हा झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या ३०० ते ४०० च्या घरात पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेलल्यांचा आकडा १९,८२१ वर पोहचला असून, ३८९ जणांचा बळी गेला आहे. या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. दररोज १५०० ते २००० वर चाचण्या होत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबवरही ताण वाढला आहे. कमी मनुष्यबळ असतानाही लॅब पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभापासून प्रतिदिन सरासरी १९०० चाचण्या करण्यात येत आहेत.
परंतु, चाचणीसाठी येणार्या स्वॅब नमुण्यांची संख्या वाढल्यामुळे यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे नमुने दिल्यानंतर प्रत्यक्ष अहवाल येण्यास चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत आहे. स्वॅब दिल्यानंतर चाचणी अहवाल माहिती व्हायला किंवा आरोग्य यंत्रणेचा फोन जायला किमान चार ते पाच दिवस लागत आहेत. तोवर या पॉझिटिव्हचा सर्वत्र मुक्त संचार झालेला असतो. यात यंत्रणेची दिरंगाई असल्याने कोरोना कसा रोखणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
भरती झाल्यानंतर येतो फोन
दरम्यानच्या काळात काही रुग्ण लक्षणांवरून रॅपीड ॲन्टिजेन चाचण्यांच्या आधारे स्वत:ला काेविड रुग्णालयात दाखल करून घेतात किंवा होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहेत. दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागातून पॉझिटिव्ह असल्याचा फोन आल्याची अनेक उदाहरणे आहेत.
व्यापाऱ्यांचे अहवालही वेळेवर नाहीत
जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल करताना व्यावसायिक व प्रतिष्ठानांमधील कामगारांना कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी मोठी धावपळ करीत कोरोना चाचणी करून घेतल्या. व्यावसायिकांच्या रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. चाचणी केल्याच्या पुराव्याच्या आधारे व्यावसायिकांनी दुकाने उघडली आहेत. परंतु, अजुनही अनेकांचे अहवाल प्रलंबितच असल्याचे वास्तव आहे.
निगेटिव्ह असल्याचा अहवालच मिळत नाही
स्वॅब दिल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीमध्ये एखादा रुग्ण निगेटिव्ह असेल, तर त्याला तसा अहवाल मिळणे किंवा मोबाईलवर मेसेज जाणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र निगेटिव्ह असलेल्यांना कोणत्याही प्रकारचा निरोप दिल्या जात नाही किंवा अहवालही मिळत नाही. चाचणी केल्यानंतर संबधित व्यक्तीची प्रचंड घालमेल होत असते.
स्वॅबनंतर होणारी प्रक्रिया
संशयित रुग्णाने स्वॅब दिल्यानंतर त्याला साधारणपणे उणे २५ तापमानात ठेवण्यात येते व त्यानंतर सायंकाळी वा दुसऱ्या दिवशी लॅबला पाठविण्यात येतात. या ठिकाणी मशीनमध्ये नमुन्यांची तपासणी होते. प्रक्रियेला चार तास लागतात. येथून रिपोर्ट सीएस कार्यालय व तेथून डीएचओ व एमओएच यांच्याकडे जातात. यानंतर संबंधित व्यक्तीला पॉझिटिव्ह अहवालाबाबत फोन केला जातो.
येथे होते दिरंगाई
स्वॅब सेंटरमधील नमुने पुरेसे ‘फ्रोजन आईस पॅक’ झाले नसतील, तर रात्रभर फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी लॅबला पाठविण्यात येतात. लॅबमध्येही अगोदरचे प्रलंबित नमुने मशीनवर लावले गेले असतील, तर थोडा उशीर होतो. लॅबद्वारे अहवाल प्राप्त झाल्यावर अधिक संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास आरोग्य यंत्रणेद्वाराही फोन करण्यास पुढचा दिवस निघतो.
सध्या चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने व्हीआरडीएल लॅबचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. चाचणी अहवाल येण्यास विलंब होता कामा नये. परंतु विलंब होत असेल, तर संबंधितांना त्याबाबत सुचना देण्यात येतील. चाचणीमध्ये निगेटिव्ह आलेल्यांनाही अहवाल देण्याची व्यवस्था करण्यात येईल.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला