अकाेला : पक्षात राजी-नाराजी कायमच असते. ही नाराजी पक्षांतर्गतच राहिली पाहिजे, बाहेर जाता कामा नये, काॅंग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता गटतट बाजूला ठेवा, सर्वांना साेबत घेऊन पायाला भिंगरी लावत जिल्हा पिंजून काढा, असा सल्ला काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिला.
स्थानिक स्वराज्य भवन येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष अशोकराव अमानकर यांचा पदग्रहण सोहळा रविवारी संपन्न झाला यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर मावळते अध्यक्ष हिदायत पटेल, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे, माजी आमदार ॲड. खतिब, अकोला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबनराव चौधरी, डॉ. सुधीर ढोणे, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील, मदन भरगड, प्रकाश तायडे, प्रशांत गावंडे, डॉ. जीशान हुसेन प्रामुख्याने उपस्थित हाेते. ठाकरे म्हणाले की, संघटना वाढविण्यासाठी सर्वांना साेबत घ्यावे लागते, गटबाजीचे राजकारण हाेता कामा नये, जिल्ह्यात संघटन कशा पद्धतीने वाढवता येईल याचा विचार करून प्रत्येकाने झाेकून देत कार्य करावे. प्रांरभी पटेल यांनी नवनियुक्त अध्यक्ष अशोक अमानकर यांना पदभार सोपविला. यावेळी जिल्हाभरातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन कपिल राव देव यांनी तर आभार प्रदर्शन भूषण ताले पाटील यांनी केले.
पटेल यांना लवकरच जबाबदारी
हिदायत पटेल यांनी पक्षाचे चांगले काम केले आहे, त्यांना चांगले पद मिळावे यासंदर्भात काही नगरसेवकांनी ठाकरे यांच्याकडे मागणी केली हाेती ताे संदर्भ लक्षात ठेवत पटेल यांना लवकरच चांगली जबाबदारी दिली जाईल असे संकेतही ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात दिले.
मी काेणत्याच गटाचा नाही, सर्वांचा
मी काेणत्याच गटाचा नाही, सर्वांचा आहे, काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण क्षमतेने पार पाडीन, २४ बाय ७ मी पक्षासाठी उपलब्ध राहीन, अशी ग्वाही यावेळी अमानकर यांनी दिली.