मूर्तिजापूर : जिल्ह्यासह मूर्तिजापूर शहरात काेराेना विषाणूचा पुन्हा उद्रेक झाला आहे. त्यामुळे काेराेना प्रतिबंधासाठी मूर्तिजापूर शहरात २३ फेब्रुवारीपासून आठ दिवसांचे संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, नागरिक नियमांची पायमल्ली करीत असून, मास्क लावण्याकडेही दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मूर्तिजापूर शहरवासियांनाे आता तरी मास्क लावा हाे... असे म्हणण्याची वेळ मुख्याधिकारी व ठाणेदारांवर आली आहे.
काेराेना प्रतिबंधासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे व ठाणेदार सचिन यादव यांनी केले आहे. मुख्याधिकारी, ठाणेदारांनी शहरातील स्थानक विभागापासून ते जुनी वस्तीपर्यंत पाहणी करीत नागरिकांना सतर्क केले. रस्त्यात कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये, नेहमी मास्कचा वापर करावा, एकमेकांशी बोलताना शारीरिक अंतर ठेवावे, हात साबणाने स्वच्छ धुवावे, असे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करावे अन्यथा नियमाप्रमाणे कारवाई करता येईल, असा इशारा ठाणेदार सचिन यादव यांनी दिला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार शनिवार संध्याकाळी ते सोमवारपर्यंत संचारबंदीची घोषणा केली हाेती. त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूरसह तालुक्यात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तालुक्यात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
...................
आठवडी बाजार बंद; विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
शुक्रवार, मंगळवारचा आठवडी बाजारही बंद करण्यात आला आहे. शहरातील समस्त व्यापाऱ्यांनी व किरकोळ दुकानदारांनी वावरणाऱ्या व्यक्तीशी कोणताही व्यवहार करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तिला नगर परिषदेकडून २०० रुपये दंड आकारला जात आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.