अकोला : जिल्ह्यात जिल्हा परिषदमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या विकासकामांच्या ठिकाणी कामांचे फलक तातडीने फलक लावण्यात यावे, अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले.
जिल्हा परिषदमार्फत जिल्ह्यात अंगणवाडी इमारतींचे बांधकाम, रस्ते दुरुस्ती, शाळा इमारतींचे बांधकाम व दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतींची बांधकाम व दुरुस्ती आदी विकासकामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणी विकासकामांचे तातडीने फलक लावण्यात यावे, फलक न लावल्यास कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदस्य विनोद देशमुख यांनी केली. त्याअनुषंगाने यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सभेत निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यातील अकोला, चोहोट्टा बाजार व शहानुर येथील जिल्हा परिषद विश्राम गृहांची दुरुस्ती करून विश्रामगृह 'बीओटी' तत्वावर देण्यात यावी, अशी सूचना सदस्य विनोद देशमुख यांनी सभेत मांडली. त्यानुसार दुरुस्ती कामांची अंदाजपत्रके मागवून, विश्रामगृह बीओटी तत्वावर देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समिती सदस्य विनोद देशमुख, शंकरराव इंगळे, मीरा पाचपोर, लीना शेगोकार, गजानन निचळ, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश रंभाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
गौण खनिज अनुदानातून रस्ते दुरुस्तीसाठी दहा कोटी द्या!गौण खनिज वाहतुकीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी गौण खनिज अनुदानातून १० कोटी ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सदस्य शंकरराव इंगळे यांनी सभेत केली.तसेच संबंधीत निधीची मागणी तातडीने जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे करण्याचेही सभेत ठरविण्यात आले.