आशिष गावंडे
अकाेला: भूमिगत गटार याेजने अंतर्गत शहरातील रस्त्यांची ताेडफाेड केली जाणार असल्याने महापालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल ९०० काेटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला हाेता. ‘पीडब्ल्यूडी’ने या प्रस्तावात त्रुटी काढल्याची माहिती असून हा प्रस्ताव पुन्हा एकदा मनपा प्रशासनाकडे टाेलवला आहे. एकूणच चित्र पाहता,भूमिगत गटार याेजनेला ग्रहण लागण्याची चिन्हं असून मनपाच्या अडचणीत भर पडल्याचे दिसून येत आहे.
‘अमृत अभियान’च्या पहिल्या टप्प्यात सन २०१७ मध्ये भूमिगत गटार याेजना निकाली काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत महापालिकेला ८७ काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला हाेता. या कामासाठी मनपा प्रशासनाने इगल इन्फ्रा नामक कंपनीची नियुक्ती केली हाेती. याेजनेच्या पहिल्या टप्प्यात माेर्णा नदीपात्रात चेंबर बांधणे व चेंबरमध्ये नदीतील सांडपाणी एकत्र करुन नदीपात्रात अंथरलेल्या मलजल वाहिनीद्वारे शिलाेडा येथील ३० एमएलडी प्लान्टपर्यंत पाेहाेचविणे व त्याठिकाणी मलशुध्दीकरण केंद्राची बांधणी करण्याचा समावेश हाेता. याव्यतिरिक्त डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेत ७ एमएलडी प्लान्टची उभारणी करण्यात आली. दरम्यान, ‘अमृत अभियान’च्या दुसऱ्या टप्प्यात जागाेजागी चेंबरची उभारणी करावी लागणार असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांसह प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांची ताेडफाेड केली जाइल. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने सुमारे ९०० काेटी रुपयांचा प्रस्ताव तयार करुन तांत्रिक मंजूरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला हाेता. या प्रस्तावात संबंधित विभागाने त्रुटी काढत हा प्रस्ताव मनपाकडे परत पाठवल्याची माहिती आहे.
...तरीही त्रुटी कशी?
‘अमृत अभियान’च्या दुसऱ्या टप्प्यात हद्दवाढ भागाचाही समावेश करण्यात आला आहे. याेजनेला प्रत्यक्षात सुरुवात केल्यानंतर शहरात सुमारे ९०० किमी अंतर रस्त्यांची ताेडफाेड केली जाइल. सार्वजनिक बांंधकाम विभागाच्या निकषानुसारच मनपा प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला हाेता. ‘पीडब्ल्यूडी’च्या सूचनेनुसार प्रस्ताव तयार केल्यानंतरही त्यात त्रुटी काढली गेल्याने मनपातील बांधकाम विभाग व तांत्रिक सल्लागार असलेल्या पुराणिक ब्रदर्सच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत.
...अन् प्रक्रिया केलेले पाणी नदीत
सन २०२० पासून शिलाेडा येथे उभारण्यात आलेल्या ३० एमएलडी क्षमतेच्या सीवरेज ट्रीटमेंट प्लान्ट (मलजलशुध्दीकरण केंद्र)मध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. शुध्दीकरण केलेले पाणी शेती किंवा उद्याेगासाठी वापरणे अपेक्षित असताना सदर पाणी थेट माेर्णा नदीपात्रात साेडले जात आहे,हे विशेष.
मनपाने प्रस्ताव टाेलवला ‘पीएमसी’कडे
सार्वजनिक बांधकाम विभागाने त्रुटी काढलेला प्रस्ताव मनपाच्या बांधकाम विभागाने तांत्रिक सल्लागार असलेल्या पुराणिक ब्रदर्सकडे टाेलवल्याची माहिती आहे. हा प्रकार पाहता, भूमिगत गटार याेजना निकाली काढण्यासाठी महापालिका प्रशासन खरच गंभीर आहे का, असा सवाल उपस्थित हाेत आहे.