अकोला : आक्षेपार्ह जाहिराती देऊन इलाजाच्या नावाखाली पैसे उकळून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील हरिद्वार येथील पंडित ओमप्रकाश जोशी या भोंदूवर रविवारी सिव्हिल लाइन पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल केले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.भोंदू ज्योतिषी हा वंध्यत्व, मतिमंदत्व, कँसर यासारख्या गंभीर शारीरिक व मानसिक आजारांवर मोठी रक्कम उकळून इलाज करण्याच्या नावाने फसवणूक करायचा. आजारांवर इलाज करण्याचा दावा करणे, जाहिरात करणे किंवा त्याचा प्रचार-प्रसार करणे हाच जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा ठरतो. हा भोंदू ज्योतिषी मागील अनेक वर्षांपासून नागरिकांची फसवणूक करीत होता. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच महानगर संघटक चंद्रकांत झटाले, युवा संघटक अॅड. अनिल लव्हाळे, अॅड. शेषराव गव्हाळे, हरीश आवारे, महिला संघटिका संध्या देशमुख यांनी त्या भोंदू ज्योतिषाची पोलिसांत तक्रार करीत भोंदूगिरीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
ज्या ज्योतिषाला आपल्यावर उद्या पोलिसांत गुन्हे दाखल होणार, याची माहिती नाही, त्याच्यावर नागरिकांनी कितपत विश्वास ठेवावा, कुठेही अशा प्रकारची नागरिकांची फसवणूक होत असेल, तर नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा.-चंद्रकांत झटाले, महानगर संघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अकोला.