अकोला: उत्पादनाच्या गुणवत्तेचा दर्जा टिकवा, आपल्या ब्रॅण्डची ओळख निर्माण करा, तुम्ही ठरवाल तसे भाव ग्राहक देतील. जी मिरची ८० रुपये किलो विकल्या जाते, तीच मिरची १८० रुपये किलोनेदेखील विकता येते. योग्य बाजारपेठ आणि संवाद कौशल्य असेल तर कुणासाठीही अशक्य नाही, असे मत सुप्रसिद्ध मसालाकिंग धनंजय दातार यांनी व्यक्त केले. रविवारी अकोल्यातील मराठा मंडळ सभागृहात दुसरे अखिल भारतीय वºहाडी साहित्य संमेलन पार पडले. दुपारच्या सत्रात सिनेअभिनेता भरत गणेशपुरे यांनी प्रसिद्ध उद्योजक मसालाकिंग धनंजय दातार यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने दातार यांनी उद्योगाची अनेक दालने नवयुवकांसाठी खुले असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.दातार यांचा कारंजा, शेगाव, अमरावती येथील प्रवास, घरची बिकट परिस्थिती आणि त्यातून श्रीमंतीचे आकर्षण त्यांनी सुरुवातीला सांगितले. दहावीत पाच वेळा नापास झालो; मात्र नोटा कमाविण्याची जिद्द कमी होऊ दिली नाही. चिंच, फिनाइल विकण्याच्या सेल्समनशिपपासून कामे केलीत. व्यवसायात तोटा आला, आईचे दागिने विकले. त्यानंतर मसाल्यात कुणी नसल्याचे पाहून हा उद्योग टाकला. प्रचंड संघर्षानंतर आता चार गल्फ कन्ट्रीमध्ये चाळीस कंपन्या कार्यरत आहेत. पैशामुळे माणसाला प्रतिष्ठा मिळते. हे लक्षात आल्यानंतर झपाटल्यासारखा पैसा कमाविला आहे; मात्र त्यात कुठेही शॉर्टकट निवडला नाही. प्रामाणिक प्रयत्न आणि गुणवत्ता टिकविली. त्याच भरवशावर मी पैसा कमाविला. माझ्या उत्पादनाचे भाव मी ठरविले. ते ग्राहकांनी दिले. त्यामुळे ग्राहक माझ्यासाठी देव आहे आणि व्यवसाय माझ्यासाठी धर्म असल्याचेही ते याप्रसंगी बोलले. मागणीनुसार बाजार केला पाहिजे. कोणत्याही व्यवसायाची लाज किंवा न्यूनगंड बाळगू नका, मी मराठी माणूस असून, माझ्या कंपनीचे नाव अल-अदील असून, पीकॉक ही भारतीयांची ओळख जपली आहे. आजही मला कुणी स्पर्धक नाही. मी थांबलो नाही. माझा व्यवसाय अजूनही विस्तारित होत आहे. नवीन शाखा नवे प्रयोग आजही सुरूच आहेत. त्यामुळे जगभरातील १८ श्रीमंत उद्योजकांत आज माझी मोजणी होत असल्याचेही त्यांनी मुलाखतीत प्रश्नास उत्तर देताना सांगितले. प्रतिष्ठा आणि पैसा कमाविल्यानंतर मी दुबईतून ९७ टक्के गुणांनी डॉक्टरेट डिग्री मिळविली आहे. केवळ पैसा कमाविण्यापुरता राहू नका, तो खर्च करून त्याचा आनंदही लुटा, असा संदेशही त्यांनी येथे दिला. भविष्यात राजकाणात येण्यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी या विषयाला बगल दिली. सोबतच भारतात भरमसाट टॅक्स भरून व्यवसाय करण्यात रस नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठी आणि वºहाडी माणसांना मोठ्या प्रमाणात मी नोकऱ्या दिल्या आहेत. भविष्यातही त्यांना मदत करीत राहील, असेही ते याप्रसंगी बोलले.