- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : लोकमत पोषण परिक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील कुपोषणाचा प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट या मेळघाटाच्या सीमेवर असलेल्या तालुक्यातही कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे; मात्र याचे गांभीर्य बालविकास प्रकल्प कार्यालयाला नसल्याची बाब सोमवारी समोर आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी सोमवारी दुपारी कार्यालयास भेट दिली असता, जबाबदार अधिकाऱ्यांसह एकही अधिकारी उपास्थित नसल्याचे दिसून आले. कार्यालयात केवळ एक परिचारिका हजर असल्याचे आढळले. या भेटीमुळे जिल्हा परिषद अंतर्गत असलेली एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात कुपोषणाबाबत किती गंभीर आहेत, हे चित्र पाहावयास मिळत आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी अधिकाºयांची झाडाझडती घेतली व शेरा नोंदविला.अकोट तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने मोठ्या प्रमाणात आदिवासीबहुल भाग आहे. या भागात कुपोषणाचे प्रभावक्षेत्र आहे. या भागातील अनेक मुले कुपोषणाच्या विळख्यात आहेत. अशा स्थितीत कुपोषणग्रस्त मुले व गर्भवती महिलांना सकस आहार पुरवण्याची जबाबदारी जिल्हा परिषदच्या आयसीडीएस अधिपत्याखाली अंगणवाडीवर आहे. त्यामुळे उपोषणाबाबतची माहिती आढावा घेण्याकरिता अचानक जिल्हा परिषदचे अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी अकोट येथील हिवरखेड मार्गावर असलेल्या कार्यालयात भेट दिली. यावेळी कार्यालयामध्ये जबाबदार अधिकारी- कर्मचारी गैरहजर आढळले. हजेरी रजिस्टर तपासले असता, सह्यासुद्धा आढळून आल्या नाहीत. अचानक जि.प अध्यक्ष आल्याची उपस्थित महिला कर्मचारी यांनी प्रकल्प अधिकारी व इतर कर्मचारी यांना माहिती देऊन बोलावले असल्याचे आढळले. यावेळी अध्यक्ष यांनी उपस्थित हजर असलेल्या एका कर्मचाºयाला धारेवर धरले. कोणकोण किती दिवसांपासून हजर नाहीत, सर्वच जण कुठे गेले, सह्या का केल्या नाहीत, कुपोषणाच्या माहितीचा तक्ता का नाही? आदी विविध प्रश्न विचारले. यावेळी उपस्थित कर्मचाºयांना समाधानकारक माहिती देता आली नाही. जि.प.अध्यक्षांनी हजेरी रजिस्टरवर नोंद करीत गैरहजेरीबाबत शेरा मारला. जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यालयात आल्याची माहिती मिळताच अधिकारी-कर्मचारी धावत-पळत कार्यालयात आले; परंतु कार्यालयामध्ये कुठलेही नियोजन नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी संताप व्यक्त केला. कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू झाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार असल्याची तंबी त्यांनी दिली.
हे कर्मचारी आढळले गैरहजर जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी दिलेल्या भेटीत बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी (सां), पर्यवेक्षिका कनिष्ठ सहायक, वाहनचालक गैरहजर आढळले, तर कार्यालयात केवळ संध्या अलोकार या परिचारक हजर होत्या.