जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी गरजेनुसार लसीचा पुरवठा होत नसल्याने वारंवार लसीकरण मोहीम ठप्प पडत आहे. लस नसल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाल्याचे चित्र गुरुवारी पुन्हा दिसून आले. कोविडचा वाढत्या प्रादुर्भावात लसीकरणाचा मोठा दिलासा आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच अनेक लोकांनी बंद लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. लस मिळणार या आशेने सकाळची दुपार झाली, मात्र लस मिळाली नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. लस नसल्याने लसीकरण केंद्र बंद राहणार, अशी सूचनाही लाभार्थींना प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे संचारबंदी असतानाही अनेक लोक कोविड लसीसाठी घराबाहेर पडले होते. लसीअभावी जिल्ह्यात वारंवार लसीकरण मोहीम ठप्प पडत आहे.
लॉकडाऊनमध्येही लसीसाठी लोक निघताहेत घराबाहेर
जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू असतानाही अनेक लोक जोखीम पत्करून घराबाहेर निघत आहेत. मात्र, लसीचा पुरवठा होत नसल्याने लाभार्थींना लस मिळत नाही. उलट लसीकरण केंद्रांवर गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.
प्रशासनातर्फे पूर्वसूचना देण्याची गरज
लसीचा साठा संपल्याने शहरासह जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद राहतात. बंद केंद्राबाहेरील लोकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वसूचना देण्याची गरज आहे.
विभागासाठी कोव्हिशिल्डचे ४२ डोस मिळाले
जिल्हा - डोस अकोला - ८,६००
यवतमाळ - ६,६००
बुलडाणा - ९८००
अमरावती १३०००
वाशिम - ४०००
शुक्रवारी आणखी मिळणार लस
गुरुवारी विभागासाठी कोव्हिशिल्डचे ४२ हजार डोस मिळाले असून, शुक्रवारी आणखी लसीचा साठा मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही लस कोणती असेल आणि किती डोस असतील याबाबत निश्चित सांगण्यात आले नाही.
आजपासून लसीकरण सुरू
जिल्ह्याला गुरुवारी कोव्हिशिल्डचे ८,६०० डोस प्राप्त झाले. त्यामुळे आज, शुक्रवारपासून लसीकरण मोहिमेला पुन्हा सुरुवात होणार आहे. तसेच आज आणखी लसीचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. मात्र, उपलब्ध लसीचा साठा हा पर्याप्त नसल्याने दोन दिवसांत ही मोहीम पुन्हा ठप्प पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.