खेट्री : बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकरशा येथील उतावळी धरणातून रब्बी हंगामाकरिता पाटबंधारे विभागाकडून पाणी साेडण्यात आले. यामुळे पातूर तालुक्यातील बुलडाणा जिल्हा सीमेवरील दहा गावांना दिलासा मिळाला आहे.
पाटबंधारे विभागाने धरणाच्या कॅनॉलमधून शेतकऱ्यांना रब्बी पिकाकरिता पाणी उपलब्ध करून दिले आहे. पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उतावळी धरणाच्या पाण्याचा शेतीसाठी लाभ मिळत आहे. त्यामुळे कॅनॉलवर पाणी घेतले जाणारे देऊळगाव साकरशा, उमरा, पांग्रा, राहेर, पिंपळखुटा, खेट्री, चांगेफळ, चान्नी, मळसूर, चतारी, सस्ती आदी गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यावर्षी शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उतावळी धरणाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उपविभागीय अधिकारी लोहार यांच्या हस्ते मशिनीचे पूजन करून २१ डिसेंबर रोजी रब्बी पिकासाठी पाणी सोडण्यात आले. यावेळी शाखा अभियंता कांबळे, बाळू चव्हाण, दीपक जावळे, गजानन चव्हाण यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.