अकोला : ग्रामीण भागात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे शिघ्र पथक कार्यान्वित केले आहे. त्यांच्याकडून सक्रियतेने काम सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसारच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शिघ्र पथक तयार करण्यात आले. या पथकाकडून गावात आलेल्या प्रवाशांसह ग्रामस्थांचीही तपासणी केली जात आहे.सोबतच जनजागृतीही केली जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजणे यांच्यासह विषय समिती सभापतींनीही त्यासाठी आधीच पुढाकार घेतला. तसेच ग्रामस्थांना घरीच राहावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. या सर्व बाबींचा परिणाम म्हणून आतापर्यंत कोणताही रुग्ण संदिग्ध आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरणही नसल्याचे डॉ. पवार यांनी म्हटले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी दैनंदिन कार्यरत आहेत. त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, साथरोग अधिकारी डॉ. सुनील मानकर, डॉ. भूषण सोनोने, डॉ. प्रशांत सिरसाट, डॉ. रवीदास पाटील, डॉ. भावना मेश्राम, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी, प्रशांत गुल्हाणे, नरेंद्र बेलोरकर, संदीप वानखडे यांचा समावेश आहे. सोबतच तांत्रिक कर्मचारी एनआरएचएम कर्मचारी अविनाश उजाडे, महेश देशमुख, राजू डहाणे, सचिन डांगे, नीलेश भिरड, रवींद्र नगराळे, राहुल बोरचाटे, रवींद्र पाठक, धनंजय पाळेकर, विजय घुगे यांचीही कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य विभागासोबतच अंगणवाडी सेविका, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही यंत्रणाही तेवढीच सहभागी असल्याचेही डॉ. पवार यांनी म्हटले आहे.