जिल्ह्यात नुकतेच लर्निंग लायसन्सचे कॅम्प तालुकानिहाय सुरू करण्यात आले हाेते. प्रत्येक तालुक्यात दाेन घेण्यात येत आहेत. हे कॅम्प अद्याप पूर्णपणे वेगातही आलेले नाहीत. कोटा पद्धतीनुसार दिवसाला ६० ते ७० जणांचे अर्जच मंजूर होत असल्याने बाकीच्या अर्जांच्या कामकाजाचे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, अकाेला उपप्रादेशिक परिहवन कार्यालयाने कामे सुरळीतपणे सुरू असल्याचे सांगितले असून शासन लवकरच कोटा वाढवून देणार असल्याची माहिती दिली आहे; परंतु ज्यांचे लर्निंग लायसन्स रद्द होण्याच्या स्थितीत आहे त्यांचे काय, याचे उत्तर मात्र विभागाने दिलेले नाही. दरम्यान, वाहन फिटनेस प्रमाणपत्रेही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
या आहेत अडचणी?
कॅम्प घेऊन तसेच सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू करून हा काेटा पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रिक्त पदे तसेच इतर अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने कामकाजावर परिणाम हाेत आहे.
रोजचा कोटा ७० चा
सध्या ऑनलाईन अर्ज केलेल्यांसह ऑफलाईन अर्ज केले, त्यांचा दररोज कमीत कमी ७० जणांचा कोटा निश्चित केला आहे. यानुसार महिन्याकाठी २१०० ते २२०० लायसन्स पूर्ण होत आहेत तसेच कॅम्पद्वारे १०० जणांची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
तारीख मिळालेले येत नाहीत, येणाऱ्यांना तारीख मिळत नाही
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे वैयक्तिक ऑनलाईनरीत्या अर्ज केल्यानंतर तारीख मिळाल्यावर १० टक्के अर्जदार हे गैरहजर राहतात. उर्वरित ९० टक्के अर्जदार त्या तारखेला सर्व प्रक्रिया पूर्ण करतात. मात्र, ऑफलाईनरीत्या येणाऱ्यांना तारीख मिळत नसल्याचे अनेक जण सांगत आहेत. काही जणांना मागील दोन महिन्यांपासून तारीख मिळाली नाही.
दैनंदिन दिलेला कोटा आणि त्याव्यतिरिक्त कॅम्पमध्ये दिलेल्या चाचणीच्या उपलब्धतेनुसार नियोजन केले जात आहे. तसेच कामकाज अधिक गतीने व्हावे यासाठी शनिवार व रविवार तसेच सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कामकाज पूर्ण हाेणार असा विश्वास आहे.
- जयश्री वसे दुताेंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
लायसन्स नव्याने काढावे लागणार की काय?
मी दुचाकीचा लर्निंग परवाना काढला आहे. यानंतर कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज आणि पैसे भरले आहेत. मात्र, तारीख मिळाली नसल्याने प्रतीक्षेत आहे.
- भूषण पाटील, अर्जदार.