ऑनलाइन शिक्षणात नेटवर्कचा अडथळा
बाळापूर : काेराेनामुळे परिसरातील ९ वी ते १२ वगळता इतर वर्ग बंद आहेत. त्यामुळे, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, तालुक्यातील हातरुण, अडसूड परिसरात गत काही दिवसांपासून नेटवर्कच राहत नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
खाद्यतेलाचे भाव वाढले; ग्राहक त्रस्त !
तेल्हारा : दिवाळीपासून तेलासह इतर साहित्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. साेयाबीन तेलाचे भाव १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. सर्वसामान्यांना महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. दुसरीकडे शेतमालाचे भाव मात्र कमी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
रस्त्यावर भरताे बाजार; वाहतुकीस अडथळा
वाडेगाव : अनलाॅक प्रक्रियेंतर्गत परिसरातील अनेक गावांत आठवडी बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक गावांमध्ये रस्त्यावरच दुकाने लावण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
महामार्गावर गावांची फलके लावण्याची मागणी
तेल्हारा : राज्य महामार्गाला अनेक गावांचे रस्ते जाेडलेले आहेत; मात्र जाेड रस्त्यावर गावाकडे जाणारी फलके लावण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागात नव्यानेच आलेल्या चालकांना मार्ग सूचत नसल्याचे चित्र आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन महामार्गावर गावांची फलके लावण्याची मागणी हाेत आहे.
पुलांना कठडे बसविण्याची मागणी
अकोला : जिल्ह्यातील अनेक पुलांना कठडे नसल्याने अपघाताची शक्यता आहे. यापूर्वीही अनेक पुलावरून वाहने खाली काेसळल्याने अपघात घडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन पुलांना कठडे बसवण्याची मागणी हाेत आहे.
मुबलक पाणी; सिंचन वाढणार !
पातूर : सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे, खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिकांकडून अपेक्षा आहेत. पाणी उपलब्ध असल्याने सिंचनात वाढ हाेण्याची शक्यता आहे.