अकोला, दि. ११- यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्हय़ात ५१ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असले, तरी डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हय़ात केवळ १५ कोटी ६३ लाख ५८ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. नोटाबंदीच्या कालावधीत कर्ज वाटपात अडचणी निर्माण झाल्याने, रब्बी पीक कर्ज वाटपाला फटका बसला. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्हय़ातील शेतकर्यांना ५१ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. दरम्यान, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारमार्फत गत ८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. नोटाबंदीच्या कालावधीत नवीन ५00 रुपयांसह १00, ५0, २0 आणि १0 रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने सर्वच प्रकारच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर लादण्यात आलेले आर्थिक निर्बंध आणि चलन तुटवड्यामुळे रब्बी पीक कर्ज वाटपावरही परिणाम झाला. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील रब्बी पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हय़ात केवळ १ हजार ६१५ शेतकर्यांना १५ कोटी ६३ लाख ५८ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत रब्बी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याने, यावर्षीच्या रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रब्बी पीक कर्जाचे वाटप १५ कोटींवरच!
By admin | Published: January 12, 2017 2:21 AM