अकोला : पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षीच्या खरीपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरण्याची गती खुंटली आहे. आजमितीस राज्यात रब्बीतील विविध पिकांची केवळ १७ टक्क्यांवर पेरणी झाली आहे.
राज्यात रबी पिकांचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर आहे. २ नोव्हेंबरपर्यंत यातील ७.५९ हजार म्हणजेच १३ टक्के पेरणी झाली होती. तीन दिवसात ४ ते ५ टक्केच यात वाढ झाली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात ८८१.७ मि.मी. म्हणजेच ७३.६ टक्के पाऊस झाला. ३१ ऑक्टोबर अखेर राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांपैकी एका तालुक्यात ० ते २५ टक्के, ४० तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १५७ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के,११३ तालुक्यात ७५ ते १०० टक्के तर ४४ तालुक्यात १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्हानिहाय आकडेवारी बघितल्यास सोलापूर ,बीड देन जिल्ह्यांत २५ ते ५० टक्के एवढाचा पाऊस पडला.
नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, भंडारा आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला तर ठाणे, रायगड,रत्नागीरी,सिंधुदूर्ग, पालघर, पुणे, सातारा, सांगली,नांदेड, हिंगोली,अकोला,वाशिम,वर्धा,नागपूर,गोंदिया आणि गडचिरोली १६ जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद झालेली आहे.
सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली, परतीचा पाऊसही आला नसल्याने रब्बी पिकांच्या पेरणीसाठी लागणारा जमिनीत ओलावाच नसल्याने रब्बी पेरणीवर परिणाम होताना दिसत आहे. २ नोव्हेंबर राज्यात ७ लाख ५९ हजार ४७७ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली आहे. यात एकूण रब्बी कडधान्ये ७ लाख ५३ हजार ३१७ हेक्टर तर तेलबियाचे क्षेत्र ६, १६० हेक्टर आहे.