बाळापूर : दोन दिवासांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी चिंतित आहे. रब्बी हंगामातील गहू, व हरभरा पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. किडीच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात तुरीची सोंगणी सुरू असून, ढगाळ वातावरणामुळे सोंगणी केलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत. खरिप हंगामातील तुरीचे पीक सध्या सोंगणीला आले असून, तालुक्यातील ग्रामीण भागात तुरीची सोंगणी सुरू आहे. गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच सध्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिके बहरली असून, हरभऱ्याचे पीक फुलधारणा अवस्थेत आहे. वातावरणातील बदलांमुळे हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गहू पिकावर खोड अळी, मर रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे यंदा गहू, तूर व हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. खरिप हंगामापाठोपाठ आता रब्बी हंगामातली पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. किडीच्या बंदोबस्तासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.
----------------------------
तूर सोंगणीची लगबग
तालुक्यात गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित आहे. तुरीचे पीक सोंगणीला आले असून, पावसामुळे तुरीचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी सोंगणीची घाई करीत असल्याचे चित्र आहे. काही भागात तुरीच्या सोंगणीची लगबग सुरू असल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
------------------------------
पेरणी केल्यापासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात आले असून, हरभऱ्यावर धुक्यामुळे कीडीचे आक्रमण वाढले आहे. त्यामुळे यंदा केलेला खर्चही निघतो की नाही, याची चिंता आहे.
- ----------------, शेतकरी