लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ढगाळ वातावरण असताना थंडी, विदर्भात असे मागील तीन आठवड्यापासून विचित्र वातावरण तयार झाले असून, याचा रब्बी पिके तसेच फळाच्या अंगीकृत गुणात्मक दर्जावर परिणाम होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञ वतरुळात वर्तविली जात आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरिपाची पिके हातची गेली,रब्बीतील पिके साथ देतील, अशी अपेक्षा असताना, विदर्भात विचित्र वातावरणाचा सामना शेतकर्यांना करावा लागत आहे. एक तर ओलावा नसल्याने पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात ६५ ते ७0 टक्के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली. यात सर्वाधिक हरभरा शेतकर्यांनी पेरला; पण मागील तीन आठवड्यांपासून या भागात ढगाळ वातावरण आहे. असे असताना थंडीपण आहे. ढगाळ वातावरण असले तर थंडी नसते, असे आजपर्यंतचा अनुभव आहे; परंतु यावर्षी हे वेगळेच वातावरण असल्याचे कृषी शास्त्रज्ञांना वाटते. हिवाळा ऋतूच्या काळात पिके, फळझाडांना दिवसा स्पष्ट सूर्यप्रकाश आणि रात्रीची थंडी असे नैसर्गिक वातावरण हवे असते. तथापि, यावर्षी या वातावरणात विचित्र बदल झालेले दिसतात. त्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता असून, किडींचा प्रादुर्भाव तसेच मूलभूत गुणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या वातावरणामुळे चांगला प्रकाश मिळत नसल्याने पिके, फळांची अन्नद्रव्य शोषणाची प्रक्रिया कमी होते. फळे लवकर परिपक्व होतात; पण त्याचा आकार लहान होतो; तसेच दर्जा घसरतो.आंबा मोहोरावर माव्याच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढते. पेरू व इतर सर्वच फळे अकाली परिपक्क होतात. हरभरा घाट्यांवर, गहू पिकांच्या ओंब्यावर प्रतिकूल परिणाम होतो. हरभर्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होतो. ज्या ठिकाणी या पिकाला पाणी दिले असेल तेथे विशेष काळजी घेण्याची गरज असते.
वातावरणाचा नवीन प्रकार!यावर्षी ढगाळ वातावरण असताना प्रचंड थंडी हा नवीनच प्रकार अनुभवायला येत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणने आहे. त्यामुळे या वातावरणाचे काय परिणाम होतील, हे आता सांगता येत नसले, तरी त्याचे पुढे काय परिणाम होतील, यावर कृषी शास्त्रज्ञांची नजर आहे.
ढगाळ वातावरणात थंडी, असे नवीनच वातावरण यावर्षी असून, शेतकर्यांनी वेळोवेळी रब्बी पिकांचे, फळझाडांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. शेतकर्यांची पिकांची काळजी घेण्यासाठी हरभरा फुलावर,घाट्यावर आला असेल तर दोन टक्के युरियाची फवारणी करावी.- डॉ. मोहनराव खाकरे,ज्येष्ठ कृषी विद्यावेत्ता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.