अकोला: परतीच्या पावसाने राज्यात बहुतांश ठिकाणी बर्यापैकी हजेरी लावल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, कृषी विभागानेही यावर्षी राज्यात ५५ लाख हेक्टरपेक्षा अधिक रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. मराठवाडा, विदर्भात शेतीची मशागतीची कामे जोरात सुरू असून, काही ठिकाणी रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण राज्यात अवर्षण स्थिती निर्माण झाली आहे; पण परतीच्या पावसामुळे अनेक भागातील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. कमी पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीडसह दक्षिण मराठवाड्याला बसला असून, पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्हय़ासह राज्यातील इतर जिल्हय़ात कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांना फटका बसला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली; परंतु परतीच्या पावसाने बर्यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याने कृषी विभागाने यावर्षी रब्बी हंगामातील पीक पेरणीचे उद्दिष्ट वाढवले आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यापासून अधून-मधून पाऊस सुरू आहे. उस्मानाबादमध्ये सोमवारी पाऊस पडला आहे. या पाण्यात पिण्याचे पाणी, जनावरांच्या चार्याची परिस्थिती सुधारली नसली तरी या पावसाचा रब्बीला फायदा होणार असल्याने शेतकर्यांनी रब्बी ज्वारी, हरभरा, करडईचे नियोजन केले आहे. दोन दिवसात या भागातील शेतकर्यांनी स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून दहा लाख क्विंटल बियाणे खरेदी केले आहे. यामध्ये परभणी मोती,ज्योती आदी वाण खरेदीवर भर दिला आहे. यासंदर्भात परभणी येथील कृषीविद्यापीठाचे कुलगुरू तसेच राहूरी येथील महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बी. वेंकटस्वरलू आणि डॉ. तुकाराम मोरे यांनी मराठवाड्यात परतीच्या पावसाने चांगला दिलासा दिल्याने शेतकर्यांनी रब्बीचे नियोजन केले आहे.आमच्याकडून १0 लाख क्विंटलच्यावर बियाणे खरेदी केले आहे. खरेदी सुरू च आहे; परंतु चारा टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा लागवडीचे उद्दिष्ट आहे. शेतकर्यांना चार्याचे बियाणे दिले जात आहे. *राज्यातील रब्बीचे उद्दिष्ट अमरावती विभागासाठी जवळपास ९ लाख ५७ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे विभागासाठी २२ लाख हेक्टर, औरंगाबाद विभाग ८ लाख ६0 हजार हेक्टर, लातूर विभाग १२ लाख हेक्टर, कोल्हापूर विभाग ५ लाख हेक्टरवर, नागपूर विभाग ४ लाख १३ हजार हेक्टर, नाशिक विभाग ४ लाख १५ हजार हेक्टर, तर कोकण ३४ लाख हेक्टर.
राज्यात रब्बी पेरणीला वातावरण अनुकूल!
By admin | Published: October 07, 2015 2:03 AM