अकोला: जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग आला असून, सध्यस्थितीत पेरणी क्षेत्राने सरासरीचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १.२२ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. परंतु पूर्वी तेलबिया वाण म्हणून मोठ्या प्रमाणात पेरणी होत असलेले करडई, सूर्यफूल जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामात सूर्यफुलाची पेरणीच झाली नसून, करडईची पेरणी केवळ ६८ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.
जिल्ह्यात दि. २६ नोव्हेंबरनंतर झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीमध्ये ओलावा वाढला. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीला गती मिळाली. काही भागात अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने त्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याला पसंती दिल्याचे चित्र आहे. सध्यस्थितीत रब्बीची पेरणी सुरू असून, पेरणी क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
जिल्ह्यात बाजारपेठेचाही अभावजिल्ह्यात शेतकरी सूर्यफूल व करडई मोठ्या प्रमाणात घेत होते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतही आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश येथील व्यापारी दाखल होत होते. परंतु हळूहळू पेरा कमी होत गेल्याने व्यापाऱ्यांनीही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. आता तर सूर्यफूल व करडईसाठी बाजारपेठच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
पीक - पेरणी क्षेत्र - टक्के
- रब्बी मका - १०५ - ३१
- रब्बी ज्वारी - ८४१ - ९२
- गहू -२१४७५ - ११२
- हरभरा - १,१५,५६५ - ९५
- कांदा - ४,९१७ -
- सूर्यफूल - ०००० - ००
- करडई -६८- २६