महापालिकेत वाहन चालक, शिपाई, कुली अशी पदस्थापना असणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट सहायक आयुक्त, विभाग प्रमुख, क्षेत्रीय अधिकारी अशा पदांचा पदभार देण्यात आला आहे. मनपातर्फे पदोन्नती देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीतर्फे कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता, तांत्रिक पदावरील कर्मचाऱ्यांचे निकष लक्षात न घेता, पदाेन्नती देण्यात आल्याचा आराेप सुनील इंगळे यांनी केला. पदाेन्नतीप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाकडून सातत्याने आयुक्तांची दिशाभूल केली जात आहे. परिणामी, बिंदुनामावलीनुसार कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने, अनेक कर्मचारी हक्काच्या पदाेन्नतीपासून वंचित असल्याचा आराेप इंगळे यांनी यावेळी केला.
सेवाज्येष्ठतेचे निकष पायदळी
मनपात मागील २० ते २५ वर्षांपासून अनेक कर्मचारी मूळ आस्थापनेवरच कार्यरत आहेत. त्यांना अद्यापही सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळाली नाही. नियमबाह्य पदाेन्नती घेतलेल्या अधिकाऱ्यांनी मनपा व शासनाची केलेली फसवणूक पाहता, त्यांच्या विराेधात आयुक्तांनी फाैजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी इंगळे यांनी केली.