अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोरील अतिक्रमित दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीनदोस्त केली. रविवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुकाने तोडण्यास सुरुवात केली. एका तासामध्ये पथकाने खुले नाट्यगृहापासून ते न्यू क्लॉथ मार्केटच्या श्रीरामद्वारपर्यंतची जवळपास १२ दुकाने पाडून टाकली. पथकाची कारवाई पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली. होती. खुले नाट्यगृहालगत नझूलच्या जागेवरील १२ दुकानांच्या भाडेपट्टय़ाची मुदत संपल्यामुळे ती जमीनदोस्त करण्याचा निर्णय मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी घेतला. दुकाने खाली करण्याचे फर्मान उपायुक्तांनी सोडल्यानंतर संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. कारवाई टाळण्यासाठी विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मससह विविध व्यापारी संघटनांनी बैठकी घेतल्या, परंतु बैठकींमधील चर्चा निष्फळ ठरल्याने अखेर महापालिकेच्या रविवारी रात्री गजराजने दुकानांवर पंजाने आघात करून दुकाने पाडण्यास सुरुवात केली. नझूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शिट नं.३९ - डी, प्लॉट क्र.८१/२ वर खुले नाट्यगृह बांधणीसाठी परवानगी देण्यात आली. यामध्ये पश्चिम भागात ३४६.५ चौ.मी. क्षेत्रफळाचा, शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, व्यावसायिक दुकानांसाठी वापर करण्यात आला होता. तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने या जागेवर भाडेपट्टय़ाने १२ दुकाने उभारण्यास संमती दिली होती. भाडेपट्टय़ाची मुदत संपल्यावरदेखील संबंधित व्यावसायिकांनी जागा रिक्त केली नाही. ही जागा दुकानांसाठी नियमित करण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी शासनाकडे परवानगी मागितली असता, ती नाकारण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी ही जागा रिक्त करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांना दिले होते. त्यानुषंगाने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शनिवारी ही दुकाने खाली करण्याचे आदेश देताच, संबंधित व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. व्यापार्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तो हाणून पाडला आणि एकापाठोपाठ एक दुकान पाडण्यास सुरूवात केली. अतिक्रमण तोडत असल्याची वार्ता शहरात पसरताच व्यापार्यांसह, नागरिकांनी खुले नाट्यगृहाजवळ गर्दी केली होती.
खुले नाट्यगृहासमोरील दुकाने जमीनदोस्त
By admin | Published: December 29, 2014 2:05 AM