लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अजय तापडिया यांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षानेही हा राजीनामा तातडीने मंजूर केला असून, महानगर जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू मुलचंदानी यांच्याकडे दिला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये झालेल्या तिकिट वाटपातील आरोप-प्रत्यारोपाला कंटाळून तापडिया यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षबांधणीसाठी ऑगस्टमध्ये अकोला दौर्यावर येत आहेत, त्यानिमित्ताने पक्षांतर्गत मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत.मध्यंतरी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अकोल्यात येऊन गेल्यात. राष्ट्रवादीतील पक्षबांधणीनिमित्त प्रथमच त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांंशी संवाद साधला. त्यावेळी अकोल्यातील कार्यकर्त्यांंंनी महानगरपालिकेतील तिकिट वाटपात अन्याय झाल्याचा गंभीर आरोप केला. महिला महानगर जिल्हाध्यक्ष मंदा देशमुख यांनीदेखील आपले कुणी ऐकून घेतले नसल्याचे सांगितले. या सर्व घटनांची गंभीर नोंद घेऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना गुरुवारी मुंबईत बोलाविण्यात आले होते. अकोल्यातील पाच पदाधिकार्यांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्यानंतर तापडिया यांनी मुंबईतच तडकाफडकी राजीनामा दिला. दरम्यान, याबाबत अजय तापडिया यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. राष्ट्रवादीची पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे दौरे राज्यभरात होत आहेत. अधिवेशनानंतर अजित पवार अकोल्याला येणार आहे. त्याआधी महानगराची कार्यकारिणी शक्तिशाली करण्याच्या दिशेने पक्षाने टाकलेले हे पाऊल असल्याचे बोलले जाते.
अपयशाला जबाबदार नाही!
महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तिकिट वाटपात पक्ष निरीक्षक आणि पदाधिकार्यांनी आपणास दूर ठेवले. महापालिकेत पक्षाला आलेल्या दारुण अपयशाला आपण जबाबदार नाही. तरीही पक्षाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात अजय तापडिया यांनी म्हटले आहे.
तिकीट कापलेल्या मुलचंदानीकडे प्रभारतापडिया यांच्या राजीनाम्यानंतर महानगर जिल्हाध्यक्षाचा प्रभार कोणाकडे द्यावा, म्हणून राष्ट्रवादीच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्यांना गुरुवारी मुंबई कार्यालयातून विचारणा केली. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू मुलचंदानी यांच्या नावाबाबत मत विचारले असता, अनेकांनी सहमती दर्शविली. त्यामुळे मुलचंदानींकडे प्रभार सोपविला गेला आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत मुलचंदानी यांचे तिकिट कापले गेले होते. त्याच मुलचंदानीं यांचेकडे आता महानगराचा प्रभार आला आहे.