अकोला : राफेल विमान खरेदीची किंमत सर्वोच्च न्यायालयापुढे उघड करावीच लागणार आहे. तसे न केल्यास न्यायालय केंद्राला नोटीस देईल. तरीही माहिती न दिल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होणारा देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणून मोदीची नोंद होईल. किंमत उघड झाल्यास त्याचे स्पष्टीकरण देताना संघाच्या नाकीनऊ येणार आहे, अशा कात्रीत मोदी अडकणार आहेत, असे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले.शासकीय विश्रामगृहात त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे प्रदेश सल्लागार आमदार बळीराम सिरस्कार, महासचिव युसूफ पुंजाणी, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे उपस्थित होत्या.हाउसिंग फायनान्स सेक्टरला नॉन बँकिंग फायनान्स सेक्टरने दिलेली ४० हजार कोटींची परतफेड १ नोव्हेंबर रोजी करायची होती, तर ३० नोव्हेंबरपर्यंत एक लाख कोटींची परतफेड करायची आहे; मात्र हाउसिंग फायनान्सकडून ही रक्कम वसूल होणे कठीण झाले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी शेअर मार्केट गडगडणार आहे. तसे झाल्यास देशात आर्थिक अराजकता माजल्याचा पुरावा जगासमोर येणार असल्याचा दावाही अॅड. आंबेडकर यांनी केला. त्यामुळे देश वाचवायचा आहे की बुडवायचा, हे ठरविण्याची वेळ हिंदुत्ववाद्यांवर आली आहे. राम मंदिर, खात्यात १५ लाख देणे, नोटाबंदी या सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याने मोदी, फडणवीस यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यातूनच शहरी नक्षलवादाचे भूत उभे केले जात आहे. सनातन्यांकडे बंदुका, बॉम्ब, हत्यारे आढळल्यानंतरही त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही अॅड. आंबेडकर यांनी केला.- युती होणे काळाची गरज!भयंकर अवस्थेतून देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षाची युती होणे काळाची गरज आहे. स्थैर्य असलेल्या पक्षांची सत्ता येणे महत्त्वाचे आहे; मात्र युतीच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये होत आहेत. प्रत्यक्षात त्यासाठी काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंत चर्चा पोहोचलीच नसल्याचेही अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.