राहुल गांधींना अटक; काँग्रेसचा अकोल्यात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 10:41 AM2020-10-02T10:41:49+5:302020-10-02T10:41:58+5:30
Congress Akola Agitation : गुरुवारी वाशिम बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील दलित युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पीडित युवतीच्या कुटुंबाची भेट घेण्यापूर्वीच अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात गुरुवारी वाशिम बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जिया पटेल यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.
हाथरस येथील निर्भयावर स्थानिक चार युवकांनी सामूहिकरीत्या बलात्कार करून तिला शेतात फेकून दिले. या दरम्यान निर्भयाचा अतोनात शारीरिक छळ करून गंभीररीत्या जखमी केल्याचे समोर आले. घटनेच्या पंधरा दिवसांनंतर उपचारादम्यान पीडितेचा रुग्णालयात मृत्यू झाला. तिच्या कुटुंबाने अंत्यसंस्कार करण्यासाठी विनवणी करूनसुद्धा पोलिसांनी मध्यरात्री घाईघाईने परस्पर पीडित युवतीचे अंत्यसंस्कार उरकवून टाकले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी गुरुवारी पीडित युवतीच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अडवून अटकेची कारवाई केली. या घटनेच्या निषेधार्थ मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्यावतीने उत्तर प्रदेश सरकार व मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व अकोला जिल्ह्याचे निरीक्षक जियाभाई पटेल, जिल्हा काँग्रेसचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.