शिर्ला : ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी राहुल गोविंदराव उंद्रे यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी पुरस्कार शासन निर्णयात जाहीर करण्यात आला आहे.गेल्या १५ वर्षांपूर्वी अकोला जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवक म्हणून रुजू झालेले ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे यांनी तालुक्यामध्ये ग्रामस्तरावर काम करीत असताना २० शासकीय आणि ७ सामाजिक पुरस्कार मिळविले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा हा पहिलाच पुरस्कार मिळवणारे राहुल उंद्रे अकोला जिल्हा परिषदेतील एकमेव ग्राम विकास अधिकारी आहेत. एकूण २७ पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाच्या शासन परिपत्रकानुसार कोकण विभागात चार, पुणे विभागात विभागात पाच, अमरावती विभागात पाच, नागपूर विभागात पाच, नाशिक विभागात पाच, औरंगाबाद विभागात पाच याप्रमाणे ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी यांना शासनाने पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण १२ मार्च २०२० रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी पुरस्कार राहुल उंदरे यांना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:10 AM