अकोट: अकोटमध्येच नव्हे, तर राज्यभर कुप्रसिद्ध असलेल्या सट्टा माफिया नरेश भुतडा याच्या मालकीच्या गवळीपुरा भागातील कस्तुरी नावाच्या बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत क्रिकेट मॅचवर सुरू असलेल्या सट्टा बाजारावर अकोट शहर पोलिसांनी रविवारी छापेमारी केली.नरेश भुतडा याच्या मालकीच्या बिल्डिंगमध्ये बिग बॅच लीग सीजन ८ दरम्यान टी-२० सीरिजमधील आॅस्ट्रेलियातील मेलबर्न स्टार आणि मेलबर्न रिनेगॅडेस यांच्यात सुरू असलेल्या अंतिम सामन्यावर मोबाइलद्वारे मोठा सट्टा बाजार सुरू असल्याची माहिती अकोटचे ठाणेदार संतोष महल्ले यांना मिळाली. मोबाइल फोनवरून सट्टा हार-जीत सुरू असल्याचेही त्यांना कळल्यानंतर ठाणेदार महल्ले यांनी पथकासह कस्तुरी बिल्डिंगमध्ये छापेमारी केली. या ठिकाणावरून आरोपी दीपक महादेवराव राऊत (४१) रा. शिवपूर बोर्डी ता. अकोट, चेतन महेश जोशी (२८) रा. शनी मंदिराजवळ अकोट या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी पंचासमक्ष मेलबर्न स्टार आणि मेलबर्न रिनेगॅडेस या मॅचवर मोबाइलद्वारे सट्टा बाजार चालवित असल्याची माहिती अकोट शहर पोलिसांना दिली. त्यानंतर अकोट पोलिसांनी नरेश भुतडा याच्या दोन कामांवर असलेल्या दोन माणसांकडून लॅपटॉप, टीव्ही, २२ मोबाइल, इंटरनेटसाठी उपयुक्त असणारे साधने तसेच नगदी २ हजार १०० रुपये असा एकूण १ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही आरोपींनी सदरचा जुगार अड्डा हा नरेश भुतडा, लक्ष्मीनारायण भुतडा, दिनेश भुतडा यांना आर्थिक लाभ व्हावा आणि त्यांच्याच मालकीचा असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. हा सट्टा अड्डा चालविण्यासाठी याच निवासस्थानात रहिवासी असलेली सारिका भुतडा मदत करीत असल्याचेही पोलिसांच्या छापेमारीत उघड झाले आहे. यावरून पोलिसांनी सदर आरोपींविरुद्ध अकोट शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्टÑ जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष महल्ले, गवई, मुंढे, असई, खेडकर, पठाण, राठी, विजू, गुरू, शुक्ल, वीरेंद्र, विजय, नरवाडे, गीता व उषा यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)