अकोला : वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघात सुरू असलेल्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर खदान पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला. या ठिकाणावरून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आदर्श कॉलनीतील आहुजा अपार्टमेंटमध्ये संदीप भारती याच्या घरात पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघांदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याची गुप्त माहिती खदानचे ठाणेदार विलास पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे आहुजा अपार्टमेंटमधील संदीप भारती याच्या घरावर छापा टाकला असता तिथे संदीप भारती, हितेशकुमार जयंतीलाल शहा, रौचल ऊर्फ काली नानकराम वरदानी हे सट्ट्याची घेवाण-देवाण करताना आढळून आले. खदान पोलिसांनी या तिघांना अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून सहा मोबाइल, एक लॅपटॉप, एक एलईडी टीव्ही, दोन रिमोट असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाई खदान पोलीस करीत आहेत. सट्टा बाजार फोफावला!जिल्हाभर सट्टा बाजार मोठ्या प्रमाणात फोफावला असून, विशेष पथक आणि खदान पोलिसांनीच सट्टा अड्ड्यावर कारवाई केली आहे. अन्य पोलीस ठाणे तसेच विविध शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र सट्टा माफियांना अभय देत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाभर सट्टा माफियांचा हैदोस सुरू असताना पोलीस मात्र त्याकडे अर्थकारणातून दुर्लक्ष करीत आहेत.