अकोला : अकोट शहरात मोठ्या धूमधडाक्यात सुरू असलेल्या तीन जुगार अड्ड्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी छापेमारी करून तब्बल 12 जुगारींना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली असून त्यांच्याकडून हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अकोट शहर मधील यात्रा चौकातील श्रीनिवास सिनेमागृहाजवळ असलेल्या जयश्री लॉटरी या दुकानात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह मंगळवारी दुपारी छापा टाकून अकोट येथील खानापूर वेस मधील रहिवासी शेषराव गोविंदा सपकाळ, मधुकर पांडुरंग वानरे, सुनिल राजाराम तेलगोटे, रा. खानापूर उत्तम ओकांर सानप राहणार यात्रा चौक, निखिल जगन्नाथ बोडखे रा. अंजनगाव नाका अकोट, नईमुद्दीन मैनुद्दिन रा. आकोट या सहा जणांना अटक केली. तर राजू बंकवाले हा फरार होण्यात यशस्वी झाला. या सात जुगारींकडून पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर अंजनगाव रोडवरील राधे राधे कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून रामटेक पुरा येथील रहिवासी बापूराव जानराव तेलगोटे, गौतम भाउजी डोंगरे रा.खानापूर, शिवदास शालीग्राम धोटे रा. खामगाव या तिघांना अटक केली असून गणेश गलांडे नामक फरार झाला आहे. या जुगार अड्ड्यावरुन वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर विशेष पथकाने तिसरी कारवाई अंजनगाव रोडवर केली असून या ठिकाणावरून नारायण नामदेव काळवाडे आणि गजू तायडे या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आकोट शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने ही कारवाई केली. या कारवाई वरून शहरासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात जुगार अडडे, वरली अड्डे व क्लब सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे.