चार जुगारींकडून एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत
अकोला : दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दनोरी येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकून चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दनोरी या गावात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून जुगार अड्ड्यावरुन विनोद जानराव वानखेडे, रविकांत बळीराम खाडे, साहेबराव शिवराम पडघाडमोल व निलेश विश्वनाथ गोलमकर (सर्व रा. चोहोटा बाजार) या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व एक दुचाकी असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगाऱ्याविरुद्ध दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.