शहर पोलीस उपअधीक्षकाच्या विशेष पथकाची कारवाई
अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोगळेकर प्लॉट येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने शनिवारी छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जोगळेकर प्लॉट येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून प्रकाश कोळसे (वय ५२, राहा. चहापत्ती कारखान्याजवळ), संजय दाणे (वय ४८, राहा. जोगळेकर प्लॉट), सुरेश शुक्ला (५२, राहा. माळीपुरा), प्रमोद वानखडे (५४, राहा. रमेशनगर, डाबकी रोड) व किशोर बनसोड (३२, राहा. रमेशनगर, डाबकी रोड) या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगारीविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विशेष पथकाने केली.