शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहत येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने धाड टाकून ८ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवसेना वसाहत येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने सापळा रचून जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या जुगार अड्ड्यावरून आशिष दोड, अजय खेडकर, विजय आखरे, गुणवंत अंधारे, सुनील नागपुरे, सचिन खरोडे, किशोर कानहेड, मंगेश उमाडे सर्व राहणार शिवसेना वसाहत यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जुगाऱ्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील जितेंद्र हरणे, महेंद्र बहादूरकर, रवी घिवे, राज ठाकूर, नदीम व विनय जाधव यांनी केली.