अकोला: जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी शुक्रवारी चार विविध ठिकाणी धडाकेबाज कारवाई करीत १२ जणांना ताब्यात घेतले. यासोबतच सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या गुन्हेगाराच्या क्लबवरही छापा टाकून २७ हजार ५० रुपयांचा ऐवज जप्त केला.पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील बीएसएनएल कार्यालयाजवळील चालणाऱ्या जुल्फीखार हॉटेलच्या मालकाचा असलेल्या क्लबवर छापा टाकला. या ठिकाणावरून पथकाने २७ हजार ५० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यामध्ये रोख रकमेसह मोबाइल व इतर मुद्देमाल आहे. यामध्ये चाँद मन्ना भुरिवाला (३४, रा. गवळीपुरा), सुरेश सूर्यभान इंगळे (६०, रा. भगीरथ रोड), केशव हरिभाऊ गावंडे (६०, रा. पोळा चौक), विजय दशरथ गोलाईत (६४, रा. अनिकट पोलीस लाइन), प्रकाश लक्ष्मण धुराट (५०, रा. गवळीपुरा), जगदीश विश्वनाथ माने (४०, रा. खदान नाका), अशोक राजाराम भगत (५५, रा. शास्त्रीनगर) यांना अटक केली. त्यानंतर या पथकाने शिवणी येथील रिलायन्स पॉइंटच्या मागे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून गजानन अंबादास भोवते (४२, रा. शिवणी), शांताराम शालीग्राम वानखडे (४४, रा. शिवर) या दोघांना अटक करून त्यांच्याजवळून २ हजार ९० रुपये रोख जप्त केली. तिसरी कारवाई सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन हद्दीतील सुधीर कॉलनीमध्ये केली. यामध्ये पोलिसांनी रंजन वासुदेव फाटकर (४०, रा. दत्तवाडी, लहान उमरी) यास अटक करून त्याच्याजवळून २ हजार २२० रुपये जप्त केले. सुधीर कॉलनीतील या जुगार अड्ड्यावरील ही चौथी कारवाई आहे. तर चौथी कारवाई लहान उमरीतील शिवाजी पुतळ्याजवळ केली. या कारवाईत पथकाने विनोद भानुदास पांचांग (४५, रा. मोठी उमरी), दिनेश राजकुमार जैन (४८, रा. शिवाजी पुतळ्याजवळ) यास अटक करून त्यांच्याजवळून २ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी केली.
विशेष पथकाची क्लबसह दारू अड्ड्यांवर छापेमारी
By admin | Published: April 15, 2017 1:35 AM