अकोट : अकोट तालुक्यात अकोली जहागीर येथील स्वस्त धान्य दुकानात वितरणाकरिता आलेला धान्य साठा साठवून ठेवलेल्या एका स्वस्त धान्य दुकानासह गोदामावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाने २३ सप्टेंबर रोजी छापा टाकला. यावेळी १,७०० क्विंटल रेशनचे धान्य आढळून आले. दरम्यान, ही कारवाई चार दिवसांपासून पुरवठा विभागाने दडपून ठेवली हे विशेष.स्वस्त धान्य दुकानातील धान्याची काळाबाजारात विक्री सर्रास सुरू आहे. मिळालेल्या माहितीवरून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ए.टी. गोठवाल यांच्या गोदामावर छापा टाकला. यावेळी वितरण व्यवस्थेतील रेशन धान्याचा साठा आढळला. तसेच ग्राहकांना पुरवठा करण्यासाठी दिलेल्या धान्यापेक्षा अतिरिक्त साठाही आढळून आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गोदामातील धान्य साठा जप्त करून सील ठोकले. तसेच दुकानातील वितरण संबंधित सर्व रेकॉर्ड जप्त केले. जिल्हा पुरवठा पथकाने छापा टाकल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील रेशनचा काळाबाजार अकोट तहसील कार्यालयाच्या संगनमताने सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अकोली जहागीर येथे गोदामावर छापा; १७०० क्विंटल रेशन धान्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:44 PM