पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाकडून कारवाई
अकोला : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या चार ठिकाणांवर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने छापेमारी केली. या चार ठिकाणावरून सहाजणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीम नगर कृषी नगर येथील रहिवासी मनीष मोहन खंडारे हा देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दारूचा साठा व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय गोदामातील रहिवासी सचीसिंग संतोषसिंग टांक (वय २८) हा देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असताना त्याला पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी रंगेहात अटक केली. त्याच्याकडून दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांहु नगर शिवनी येथील रहिवासी जनार्दन किशन वानखडे (४०) तसेच गौतम राजाराम शिरसागर (रा. कुंभारी) व शेर अली सर्वर अली (रा. शिवणी) या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड येथील रहिवासी सुनील पांडुरंग इंगळे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने सिव्हिल लाइन्स एमआयडीसी व खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांवर छापे मारून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.