अकोला : शहरातील अकोट फाइल पोलीस स्टेशन तसेच डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री उशिरा छापेमारी केली. तीन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून सुमारे सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूरपीडित कॉलनी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून शेख फिरोज शेख चांद (राहणार इंदिरानगर), अजय रमेश राऊत (राहणार अकोट फाइल), बाबूलाल नागोजी पाटील (राहणार इंदिरानगर अकोट फाइल), उस्मान शाह लुकमान शाह (राहणार पूरपीडित कॉलनी) या चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर गणेश श्रीकृष्ण तेलगोटे हा त्याच्या राहत्या घरातून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असताना छापा टाकण्यात आला. त्याच्या घरातून ३० हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. या दोन कारवायांनंतर विशेष पथकाने डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमोल दामोदर गिते (राहणार गजानन नगर डाबकी रोड) याच्या घरातून दारूचा साठा जप्त केला. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तीन ठिकाणी छापेमारी करून सहा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या अवैधधंद्यांचे चालकांवर डाबकी रोड व अकोट फाइल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.