अकोला : दक्षिण-मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या नांदेड ते अकोला मार्गावरील पॅसेंजर गाड्या बंद असल्याने या मार्गावरील हिंगोली, वाशिम व परभणी जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी संघटना, रेल्वे प्रवासी आणि डीआरयूसीसी सदस्यांमध्ये प्रचंड रोष असून, अकोलामार्गे नांदेड ते खंडवा डेमू गाडी सुरू करण्याची मागणी त्यांनी दक्षिण -मध्य रेल्वेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडून अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर होत असलेल्या भेदभावामुळे परिसरातील रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. कोरोना संसर्ग काळात अकोला-पूर्णा दोन व अकोला-परळी एक अशा तीन पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पूर्णा-अकोला डेमू ट्रेन सुरू करण्यात आली. मात्र, दोन पॅसेंजर गाड्या अजूनही बंद आहेत.
सध्या रेल्वे बोर्डाने एक्स्प्रेस म्हणून काही पॅसेंजर गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये परळी ते अकोला दरम्यानच्या रेल्वेचाही समावेश आहे. परंतु, अजूनही ही गाडी सुरू झालेली नाही. खंडवा ते अकोला आणि अकोला ते नांदेड दरम्यान दररोज हजारो व्यापारी प्रवास करतात. परंतु ब्राॅडगेज परिवर्तनाचे काम थांबल्याने अकोला ते खंडवा दरम्यान थेट रेल्वे सेवा सध्या बंद आहे. आता अकोला - पूर्णा दरम्यान डेमू ट्रेन सुरू झाली आहे. या गाडीला दोन्ही बाजूंनी इंजिन असल्याने खंडवा रेल्वे स्थानकावर आणि पूर्णा रेल्वे स्थानकावर इंजिन मागे व पुढे वळवण्याची समस्या संपली आहे. त्यामुळे नांदेड ते खंडवा अकोलामार्गे डेमू ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
रोटेगाव - नांदेड डेमूचा रेक वापरावा
दक्षिण - मध्य रेल्वेकडून अलीकडेच रोटेगाव - नांदेड डेमू रेल्वे बंद करण्यात आली आहे. या गाडीचा रेक रिक्त झाला आहे. हा डेमू रेक नांदेड ते खंडवा अकोलामार्गे दरम्यान चालविल्याने या भागातील हजारो व्यापारी, प्रवासी, शेतकरी यांना रेल्वेचा लाभ मिळेल.
हे कार्यकर्ते सरसावले
नांदेड ते अकोला दरम्यान डेमू ट्रेन सुरू करण्याची मागणी डीआरयूसीसी सदस्य राकेश भट्ट, नंदकिशोर तोष्णीवाल, वाशिमचे महेंद्र गुलाटी, बासमतचे अमजद बेग, हिंगोली जिल्हा रेल्वे विकास समितीचे शोएब वसेसा, एस. रियाज अली, सोनू नैनवानी, गणेश साहू, जेठानंद नैनवानी, धरमचंद बडेरा, बासमतचे नवीन चौकडा, अकोल्याचे अमोल इंगळे, अमोल डोईफोडे, अकोटचे विजय जितकर, धीरज बजाज यांनी केली आहे.