संजय उमक
मूर्तिजापूर : रेल्वे ब्रिज (दादरा) पुलाच्या पायऱ्या खचून अपघात झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. त्यामुळे हा ब्रिज रेल्वे प्रशासनाने बंद केला होता. प्रवासी पायऱ्या चढत असताना ही घटना घडली. मात्र, हा ब्रिज जीर्ण झाल्याने बल्लारपूर येथील घटनेची पुनरावृत्ती मूर्तिजापुरातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तिकिट घर ते शकुंतला प्लॉट फॉर्मपर्यंत फुट ओव्हर ब्रिज आहे. हा ब्रिज चार प्लॅटफॉर्मला जोडला आहे. हा पूल इंग्रज कालीन असून, आता जीर्ण झाला आहे. विशेषतः या पुलाच्या पायऱ्या लोखंडी असल्याने त्या गंजून जीर्ण झाल्या आहेत. २३ नोव्हेंबर रोजी काही प्रवासी या ब्रिजवरुन प्लॅटफॉर्मकडे जात असताना त्या पायऱ्या तुटल्या. त्यात दोन प्रवाशांचे पाय अडकून जखमी झाल्याची माहिती आहे.
रविवारी बल्लारपूर येथे अशीच घटना घडून १३ प्रवाशी वीस फूट उंचीवरून पडल्याने जखमी झाले. या ब्रिजची स्थिती बघता या घटनेची पुनरावृत्ती मूर्तिजापुरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, अपघातानंतर तिकीट घराकडील चढण्या-उतरण्याचा रस्ता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी बंद केला आहे. बल्लारपूरची पुनरावृत्ती होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.