सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी पाहावयास मिळत आहे. सध्या केवळ विशेष रेल्वे धावत असल्याने आरक्षित तिकिटांवरूनच प्रवास करणे बंधनकारक आहे. मुंबई ते कोलकाता या मार्गावरील महत्त्वाच्या असलेल्या स्थानकावरून दररोज तब्बल ११२ एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा सुरू आहे. यापैकी बहुतांश गाड्यांचे आरक्षण आगामी चार ते पाच दिवसांसाठी फुल झाले आहे.
सध्या सुरू असलेल्या गाड्या
०२१०५ मुंबई - गोंदिया
०२११ मुंबई - अमरावती
०१०३९ कोल्हापूर - गोंदिया
०२८०९ मुंबई - हावडा
०२१६९ मुंबई - नागपूर
०२२८० हावडा - पुणे
०२८३३ अहमदाबाद - हावडा
मुंबई- पुण्याचे तिकीट मिळेना
अकोला रेल्वेस्थानकावरून प्रामुख्याने मुंबई व पुण्याच्या दिशेन प्रवास करणाऱ्याची संख्या अधिक आहे. सणासुदीच्या दिवसांत या मार्गावरील गाड्यांमध्ये नेहमीच गर्दी पाहावयास मिळते. विदर्भ एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस या मुंबईकडे जाणाऱ्या, तर महाराष्ट्र एक्स्प्रेस, हावडा-पुणे स्पेशल या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आगामी तीन ते चार दिवस आरक्षण फुल आहे.
दकिषीणेकडील मार्गावर गर्दी कमीच
अकोला स्थानकावरून वाशिम- पूर्णा- नांदेडमार्गे दक्षिण भारताकडे रेल्वे गाड्या जातात. दक्षिण-मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या कमी असते. सणासुदीचे दिवस सुरू झाल्यानंतरही हैदराबाद, तिरुपतीकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मुबलक प्रमाणात आसन उपलब्ध आहेत.
ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग
कोरोनाची लाट ओसरल्यामुळे नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. रेल्वेस्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्येही कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र आहे. अनेकांच्या तोंडावर मास्क दिसत नाही. गर्दी असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचाही पुरता बोजवारा उडत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर कोरोनाचा आलेख पुन्हा उंचावण्याची भीती नाकारता येत नाही.