अकोला: नांदेड-अकोला मार्गाने वर्धा जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशाला नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस रेल्वेगाडीमध्ये लुटल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणात जीआरपी पोलिसांनी अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.वर्धा येथील आनंद नगरात राहणारे शोएब खान इजराइल खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी नांदेडवरून वर्धा जाण्यासाठी रेल्वेगाडीने निघाले असता, रेल्वे डब्यामध्ये पगडी घातलेले तिघे जण आले. या तिघांनी त्यांना धमकावत त्यांच्याकडील रोख दोन हजार रुपये, ११ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावला आणि पसार झाले. त्यांच्या तक्रारीनुसार जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोबाइल लंपासरेल्वे स्टेशनवर आल्यानंतर गीतांजली एक्स्प्रेसच्या डब्यामध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने गोपीकिसन मदनलाल कासट (७४ रा. गोरक्षण रोड) यांच्याकडील मोबाइल चोरल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्यांच्या तक्रारीनुसार जीआरपी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गत काही दिवसांपासून रेल्वेस्थानकावर चोरटे सक्रिय झाले असून, रेल्वे डब्यात चढणाऱ्या प्रवाशांकडील दागिने, मोबाइल लंपास करीत असल्याच्या घटना घडत आहेत.