अकोला: रेल्वे प्रशासनातर्फे प्रवासातील आरक्षणाची यादी आॅनलाइन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा थेट फायदा रेल्वे प्रवाशांना ठरावीक गाडीसाठी तिकीट आरक्षित करताना होणार आहे. रेल्वे प्रवाशांना ही यादी ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर आॅनलाइन पाहता येणार आहे.रेल्वे विभागाने उचललेल्या या पावलामुळे रेल्वे प्रवाशांना ठरावीक गाडीतील आरक्षणाची स्थिती कळू शकणार आहे. शिवाय, गाडीच्या डब्याची सचित्र माहितीदेखील ग्राफिकल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पाहता येणार आहे. बर्थनुसारच त्याचा तपशीलदेखील प्रवाशांना संकेतस्थळावरच आॅनलाइन पाहणे शक्य होणार आहे. ही यंत्रणा सर्वच रेल्वेगाड्यांच्या बाबतीत उपलब्ध राहणार आहे. आरक्षित व विनाआरक्षित प्रवासाची जागा विविध रंगांनी दर्शविण्यात येणार आहे. त्यामुळे आरक्षित केलेल्या जागा, रिकाम्या जागा रेल्वे प्रवाशांना कळू शकणार आहेत. आगामी वीस दिवसांमध्येच ही सुविधा शताब्दी आणि राजधानी गाड्यांसाठी उपलब्ध होणार असून, यानंतर इतर सर्वच रेल्वेगाड्यांसाठी ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.अशी असेल सुविधा!
- गाडीच्या डब्याची सचित्र माहिती.
- बर्थनुसार तपशील पाहता येईल.
- आरक्षित व विनाआरक्षित जागा विविध रंगात दाखविण्यात येतील.
- ही यंत्रणा सर्वच गाड्यांची माहिती देईल.
- मोबाइल इंटरनेटवरही या सुविधेचा लाभ घेणे शक्य.
या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोबाइलवर अॅपच्या माध्यमातून ही सेवा पुरविण्यात येणार असल्याची शक्यता आहे. अद्याप यासंदर्भात सविस्तर सूचना वरिष्ठ स्तरावरून आमच्यापर्यंत आली नाही.- राजेंद्र शिंदे, जनसंपर्क अधिकारी, दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड.