लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अकोला विभागाच्या दिवाळीचे उत्पन्न यंदा पाच कोटींच्या पार पोहोचले आहे. यामध्ये दिवसेंदिवस ई-तिकीट विक्रीचा टक्का सातत्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. अकोल्यातून रेल्वे-एसटी प्रवासाचे उत्पन्न वाढत असले तरी सुविधा देण्यात दोन्ही प्रशासन कमकुवत ठरत आहेत.दिवाळीच्या निमित्ताने देशभरातील प्रवासावर अब्जावधीची उलाढाल होत असते. या उलाढालीत अकोल्याचा सहभागही कमी नाही. यंदा अकोल्याने या दिवाळीत पाच कोटींची भर घातली आहे. त्यात रेल्वे प्रशासनाने साडेतीन कोटी तर एसटी विभागाने जवळपास दीड कोटींचा नफा मिळविला आहे. ही आकडेवारी दोन्ही विभागांतून पुढे आली आहे. गत महिन्याच्या २५ आॅक्टोबरपासून तर आतापर्यंत दिवाळीची धूम राहिली. दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्यांची रीघ पाहता, एसटी आणि रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सोडल्या होत्या. त्यावर मोठ्या प्रमाणात उलाढालही झाली. आॅक्टोबरमध्ये असलेल्या दिवाळीची तयारी सप्टेंबर महिन्यापासूनच सुरू झाली होती. त्यामुळे १ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबरपर्यंत अकोल्याच्या आरक्षण खिडकीतून दीड कोटींची बुकिंग झाली. याशिवाय आॅनलाइनचे अकोल्यात दहा एजंट आहेत. त्यांच्या माध्यमातून आणि इतर व्यक्तिगत ई-तिकिटांची नोंदी जोडली असता अकोल्यातून तीन कोटींच्या पार उत्पन्न झाले आहे. जेवढी उलाढाल अकोल्यातील रेल्वेस्थानकांच्या तिकीट खिडकीतून झाली, तेवढीच उलाढाल ई-तिकीटची झाली आहे. याशिवाय जनरल तिकीट वेगळे. त्यांची कोणतीही नोंद नाही.त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागानेदेखील दिवाळीच्या काळात १ कोटी ४७ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. २४ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंतच्या उत्पन्नाचा यामध्ये समावेश आहे. मुंबई-पुणे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून, सर्वात जास्त उत्पन्न याच मार्गावरून एसटी विभागाला मिळाले आहे. रेल्वे-एसटीने पाच कोटी पारचे उत्पन्न मिळविले असले तरी प्रवासी सुविधेत मात्र दोन्ही सेवा दुबळ्या असल्याचे प्रवाशांचे मत आहे.
रेल्वे-एसटीची दिवाळी पाच कोटींच्या पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:36 PM