शेगाव (जि. बुलडाणा) : गत दोन वर्षांत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या अडीअडचणी जाणून त्या दूर करण्यासाठी यथोचित प्रयत्न केले. त्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाचे वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी बुधवारी येथे दिली. मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा प्रत्येक विभागाने जनतेपर्यंत मांडावा, असे केंद्र शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार बुधवारी भुसावळ रेल्वे विभागाच्यावतीने मागील दोन वर्षांंत विभागांतर्गत प्रवाशांसाठी केलेली कामे व दिलेल्या सुविधांचा आढावा शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडण्यात आला. वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांचे महाराष्ट्र एक्स्प्रेसने शेगाव येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यानंतर रेल्वेच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, शेगाव रेल्वे स्थानकावर अतिरिक्त पादचारी दादरा, रेल्वे टिकीट खिडकीवर होणारी गर्दी पाहता अतिरिक्त काउंटर, चौकशी कक्ष, पिण्याचे पाणी, वाहन पार्किंग आदी व्यवस्था रेल्वे प्रशासनाने अग्रक्रमाने केल्या आहेत. याशिवाय अकोला, मलकापूर, भुसावळ आदी रेल्वे स्थानकेही अद्ययावत केली आहेत. राहिलेली कामे प्रगतिपथावर आहेत, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, शेगाव रेल्वे स्थानकातून तिकिटांची अवैध विक्री व ऑटोरिक्षाचालकांचा प्रवाशांना होणारा त्रास याची आपण गंभीर दखल घेतली असून, संबंधित विभागाला कारवाई करण्याच्या सूचना देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये सुपरफास्ट गाड्यांना शेगाव येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रवाशांच्या सुविधा वाढविण्यावर रेल्वेचा भर !
By admin | Published: June 22, 2016 11:59 PM