अकोला : सध्याच्या काळात वाय-फायचा वापर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे येथील रेल्वे स्टेशनवर वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली आहे; परंतु या वाय-फाय सुविधेबद्दल अनेकांना माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. या सेवेबद्दल बहुतांश प्रवाशांना माहितीच नसल्याने अडचणी येत आहेत.रेलटेलकडून येथील रेल्वे स्टेशनवर फ्री वाय-फायची सुविधा दिली जात आहे. गत दोन वर्षांपासून ही सुविधा कार्यरत आहे; परंतु या सुविधेबाबत अनेकजण अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. येथील रेल्वे स्थानकावरून बहुतांश ग्रामीण भागातील नागरिक प्रवास करतात. या प्रवाशांना याबाबत कमीच माहिती आहे. तसेच युवापिढीतील प्रवाशांनाच याबाबत थोडीफार माहिती आहे. येथील स्थानकावर वाय-फाय सुविधा सुरळीत सुरू असली तरी वापर कमी प्रमाणात होत आहे. रेल्वे स्थानकावर काही ठिकाणी वाय-फायचे फलकही लावण्यात आले आहेत.
प्रवासी रेल्वेतून रोज प्रवास करतात २७९०
एक्स्प्रेसचे प्रवासी १९६०
पॅसेंजरचे प्रवासी ८३०
प्रवाशांना वाय-फाय ठाऊकच नाही!
येथील रेल्वे स्थानकावरून अनेकवेळा नागपूर, नाशिकला जात असतो. वाय-फाय सुविधा सुरू असल्याची माहिती आहे; परंतु ते कसे सुरू करावे याबाबत माहिती नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत.
- प्रदीप टाले, प्रवासी
रेल्वे स्थानकावर रेल्वे सुविधेचा लाभ मिळतो, याबाबत माहिती नाही. रेल्वेस्थानकावर गेल्यावरही स्वत:चे नेटच वापरले जाते. कोरोनामुळे काही महिन्यांपासून रेल्वेचा प्रवासही टाळत आहे.
- नितीन गवई, प्रवाशी
रेल्वे कर्मचाऱ्यांना वाय-फायबद्दल माहिती, पण...
मागील दोन वर्षांपासून येथील रेल्वे स्थानकावर वाय-फाय सुरू आहे. सुरुवातीला या वाय-फायचा वापरही केला; परंतु काही अडचणी येत असल्याने स्वत:चे मोबाईलमधील नेटच वापरत आहे.
- रेल्वे कर्मचारी
रेल्वेच्या वाय-फायबद्दल माहिती आहे. हे वाय-फाय सुरू करण्यासाठी वारंवार लॉगइन करावे लागते. त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. परिणामी, वाय-फाय वापरणे बंद केले आहे.
- रेल्वे कर्मचारी