लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात प्रदीर्घ उघडीपीनंतर १८ जुलैच्या रात्री ३ वाजतानंतर जिल्हाभर सर्वदूर पाऊस कोळसण्यास सुरुवात झाली. या पावसामुळे यापूर्वी पेरणी केलेल्या व पावसाची गरज असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच पेरणी न झालेल्या शेतांमध्ये शेतकरी पेरणी करण्याच्या तयारीला लागले आहेत.अकोला तालुक्यासह जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर , बार्शीटाकळी या सर्वच तालुक्यात मंगळवारी उत्तररात्री पावसाला सुरुवात झाली. अकोट तालुक्यातील सावरा, वणीवारूळा, देवरी, मुंडगाव, अकोलखेड, उमरा, आंबोडा या गावांसह संपूर्ण तालुक्यात रात्री ३ वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत पाऊस पडला. तालुक्यात १८जुलैपर्यंत केवळ ५७ मि.मी. पाऊस पडला आहे. तेल्हारा तालुक्यात याच सुमारास पावसाला सुरुवात झाली. तो सकाळी १० वाजेपर्यंत रिमझिम रिमझिम पडला. यात हिवरखेड, बेलखेड, दानापूर, अडगाव, माळेगावबाजार, वाडी आदमपूर, दहीगाव अवताडे, वाडी उकळी, पंचगव्हाण, पिवंदळ येथे पाऊस पडला. रात्री ९ वाजतानंतर तालुक्यात जोरदार पाऊस कोसळणे सुरू झाले. तालुक्यात आतापर्यंत १५५.५६ मि.मी. पाऊस पडला. मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात मंगळवारी रात्री ४ वाजतापासून सकाळी ७ वाजेपर्यंत पाऊस पडत होता.बार्शीटाकळी तालुक्यात १८ जुलैच्या सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत व रात्री ३ वाजतापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्वत्र पाऊस पडला. यात राजंदा मंडळात ३० मि.मी. महान- २०, पिंजर-२०, खेर्डा-१६, बार्शीटाकळी-०३, धाबा-१५ मि.मी. पाऊस पडला. पातूर तालुक्यात मंगळवारी रात्री ३ वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत पातूर शहरासह देऊळगाव, आलेगाव, शिर्ला, खानापूर, खामखेड, कोठारी, चान्नी, चतारी, विवरा, चरणगाव, नांदखेड, आस्टुल, पास्टुल परिसरात जोरदार पाऊस पडला. बाळापूर तालुक्यात मंगळवारी रात्री ३ वाजतापासून सकाळी ६.३० वाजेपर्यंत सर्वदूर पाऊस पडला. यात मंडळनिहाय पावसाची आकडेवारी याप्रमाणे- वाडेगाव-०८ मि.मी. पारस-०७, उरळ -०४, हातरूण- ११, निंबा-१०, व्याळा-०९ मि.मी. पाऊस पडला आहे.
अकोला जिल्ह्यात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 1:31 AM